मराठी माणसाला आणि त्यातही कोकणी माणसाला ‘गृहीत’ धरण्याची सवय सर्वच प्रशासनांना लागली आहे. रेल्वेच्या एकूण कारभारात कोकण रेल्वेला आणि त्यातही कोकणाला अतिशय सावत्र वागणूक नेहमीच मिळत असते. अनेक एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाडय़ांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबाच न देण्याचा उद्धटपणा रेल्वे प्रशासन करीतच असते. त्यात आता कोकण मार्गावरील ४-५ गाडय़ांपैकी खेडय़ापाडय़ांतील चाकरमान्यांच्या दृष्टीने अतिशय उपयोगी आणि महत्त्वाची असलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजरवर संक्रांत कोसळली आहे. दुपारी ३.०० च्या सुमारास दादरला पोहोचणारी ही गाडी रेल्वे प्रशासन कधीही अचानकपणे दिवा स्थानकावरच संपवते. त्यामुळे गावाहून सामानसुमान घेऊन येणाऱ्या बायकामुलांना दिवा स्थानकावर लोकल पकडून दादपर्यंत येण्याची शिक्षा भोगावी लागते. परंतु त्यापेक्षाही भयानक शिक्षा दादरहून ही गाडी सुटण्याच्या थोडाच वेळ स्थानकावर पोहोचलेल्या प्रवाशांना भोगावी लागते. ही गाडी आज दादरहून नव्हे तर दिव्याहून सुटणार असल्याचे त्यांना ऐनवेळी कळल्यानंतर त्यांची होणारी धावपळ आणि पदरी पडणारा मनस्ताप केवळ असह्य़ असतो. गेल्या तीन महिन्यांत ही गाडी अशा प्रकारे अनेक वेळा दिव्यालाच संपवून पुन्हा तेथूनच सोडण्यात आली आहे.
कोकण रेल्वेवर कोकणासाठी धावणाऱ्या मोजक्या गाडय़ांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाडीचा समावेश आहे. वर्षभर या गाडीला गर्दी ठरलेलीच असते. दादरहून दुपारी ३.३५ वाजता सुटणारी ही गाडी पकडण्यास प्रवासी अडीचपासूनच गर्दी करतात. ही गाडी रत्नागिरीहून दादरच्या दिशेने सकाळी सहाच्या सुमारास निघते. ती दादरला अडीच-पावणेतीनच्या सुमारास पोहोचणे अपेक्षित असते. मात्र कोकण रेल्वेच्या परंपरेनुसार गाडीला अनेकदा उशीरच होतो.
गेल्या तीन महिन्यांपासून आठवडय़ातील किमान चार दिवस तरी ही गाडी दादरला आणण्याऐवजी दिव्यालाच संपवण्यात येते आणि त्यानंतर परतीच्या मार्गावर दिव्याहून सुटण्याच्या वेळेस, म्हणजे ४.१५ वाजता रत्नागिरीकडे रवाना केली जात आहे. ही गाडी दिव्याहून सुटणार असल्याची उद्घोषणा अगदी आयत्या वेळी, पावणेतीन तीनच्या सुमारास केली जाते. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षेत दादरला उभ्या असलेल्यांना ऐनवेळी बॅगा, लहान मुले घेऊन लोकलच्या गर्दीतून दिव्य करीत दिवा स्थानक गाठावे लागते.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांना विचारले असता, या प्रवाशांसाठी खास दिव्यापर्यंत एक विशेष लोकल गाडी चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करते. ही गाडी रत्नागिरीहून येतानाच उशिरा येते. त्यामुळे वेळा सांभाळण्यासाठी ती दिवा येथे रद्द करून पुन्हा मागे वळवावी लागते, असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे मार्गावर गाडय़ा चालवण्याची जबाबदारी मध्य रेल्वेची आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही गाडी दिवा येथे रद्द करून पुन्हा दिव्यावरून रत्नागिरीच्या दिशेने चालवण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. मध्य रेल्वेकडे याबाबत विचारणा केली असता, आमच्याकडे या गाडीसाठी मार्गिका नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे आमचाही नाइलाज आहे, असे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
हा खेळ कशासाठी?
रेल्वेला ही गाडी वेळेत चालवता येत नसेल, तर किमान या गाडीचे नाव बदलून ती ‘दिवा-रत्नागिरी’ अशीच चालवावी. पण ‘दादर-रत्नागिरी’ हे नाव देऊन ती दिवा येथून चालवणे, ही प्रवाशांची फसवणूक आहे. दादरला गाडीची वाट बघत उभे असताना अचानक उद्घोषणा होते की, आज ही गाडी दिव्यावरून चालवण्यात येत आहे.. अशा वेळी जागा पकडण्यासाठी आणि शांततापूर्ण प्रवास करण्यासाठी अर्धा तास आधी आलेल्या प्रवाशांना धावपळ करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. हा प्रकार म्हणजे भारतीय दंडविधानाच्या ४२०व्या कलमासारखा शुद्ध फसवणुकीचा आहे. रेल्वेने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.     
-संजय कदम (प्रवासी)
दादपर्यंत लोकल ट्रेनने?
गावाहून येताना माणूस अनेकदा भरपूर सामान घेऊन येतो. दादरला उतरून टॅक्सी पकडून आरामात घर गाठायचे, असे मनसुबे रंगवणाऱ्या प्रवाशांवर अचानक दिवा स्थानकातच उतरण्याची वेळ येते. दादपर्यंत आरामात बसून प्रवास करण्याऐवजी लोकल ट्रेनमध्ये हातातील सामान सांभाळत, धक्के खात दादर गाठावे लागते. या सगळ्यात वेळेचा अपव्यय तर होतोच. पण मनस्तापही होतो. रेल्वेने कृपया याबाबत दखल घ्यावी.
कमल शिंदे (प्रवासी)
एक एक्सप्रेस म्हणजे तीन लोकल गाडय़ा!
एखादी लांब पल्ल्याची गाडी वेळेपेक्षा उशिराने आली, तर त्याचा परिणाम उपनगरीय लोकल सेवेवर झाल्याशिवाय राहत नाही. रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर गाडी अनेकदा उशिरा येते. मग ही गाडी दादपर्यंत आणण्यासाठी मेन लाइनमधील एक जलद मार्गिका दादपर्यंत मोकळी ठेवावी लागते. एका लांब पल्ल्याच्या गाडीसाठी मार्ग मोकळा करायचा असेल, तर तीन लोकल गाडय़ांचे वेळापत्रक बिघडते. याचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर होतो. त्यामुळे दादर-रत्नागिरी ही गाडी अनेकदा दिव्यावरूनच चालवण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
– अतुल राणे,
(मुख्य जनसंपर्क अधिकारी. मध्य रेल्वे.)