ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी मराठी रंगभूमीसाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण काकडे यांनी मुंबईत दादर येथे केले.
दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रत्नाकर मतकरी कृतज्ञता सोहळ्या’त ते बोलत होते.
काकडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वि. ना. श्रीखंडे, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आदी उपस्थित होते.
‘छबिलदास’च्या प्रायोगिक नाटय़ चळवळीतही मतकरी यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून काकडे म्हणाले की, दर महिन्याला दोन नवीन एकांकिकांचे सादरीकरण त्यांनी तब्बल वर्षभर छबिलदासमध्ये केले. त्यांच्या या नाटय़यज्ञाला तोड नाही. त्यांच्याबरोबर मात्र मला कोणतीही नाटय़निर्मिती करता आली नाही, याची खंत वाटते.
या वेळी भटकळ म्हणाले की, मतकरी हे निरलस वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्त्व असून गेल्या साठ वर्षांत त्यांनी तरुण पिढीला प्रेरणा, स्फूर्ती आणि मार्गदर्शन निरपेक्षपणे केले आहे. कोणत्याही सन्मानापेक्षा मतकरी यांनी नेहमीच कामावर मनापासून प्रेम केले आणि कलेच्या विविध प्रांगणांत मुशाफिरी करताना आपले सामाजिक भानही कायम ठेवले.