कर्नाटक विधानसभा निवडणुकीत इंडी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री बी. एस.येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पार्टीकडून (केजीपी) उभे राहिलेले माजी आमदार रवी पाटील हे महाराष्ट्रात सोलापुरात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत करणार आहेत. त्यांनी स्वत: याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
सोलापूरच्या शेजारी विजापूर जिल्ह्य़ातील इंडी येथून यापूर्वी सलग तीन वेळा कर्नाटक विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेलेले रवी पाटील हे मागील विधानसभा निवडणुकीत मोठय़ा मत फरकाने पराभूत झाले होते. सोलापूरचे खासदार तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे रवी पाटील यांचे शत्रू क्रमांक एक समजले जातात. त्यामुळे यंदाच्या इंडी विधानसभा निवडणुकीत रवी पाटील यांना रोखण्यासाठी सुशीलकुमार शिंदे हे प्रयत्न करणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. शिंदे यांच्या इंडी परिसरात दोन जाहीर सभा आयोजित केल्या जात असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
रवी पाटील हे यापूर्वी तीन वेळा कर्नाटक अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले तरी सोलापूरच्या राजकारणात त्यांनी जवळपास सर्व राजकीय पक्षांचा प्रवास केला आहे. सुरुवातीला काँग्रेस, नंतर जनता दल, भाजप-शिवसेनेला समर्थन याप्रमाणे राजकीय प्रवास करणारे रवी पाटील यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र राष्ट्रवादीशी असलेला त्यांचा हा संबंध केवळ महापालिका निवडणुकीपुरताच सीमित राहिल्याचे दिसून येते. कारण नंतर ते कधीही राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. एकंदरीत राजकीय धरसोडीच्या व तडजोडीच्या वृत्तीमुळे त्यांची सोलापूरच्या राजकारणातील विश्वासार्हता संपुष्टात आल्याचे मानले जाते.
या पाश्र्वभूमीवर रवी पाटील हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कर्नाटक जनता पार्टीच्या माध्यमातून उभे राहिले तरी सोलापूरच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप-सेना युतीबरोबर पुन्हा जाणार नाहीत. त्याऐवजी राष्ट्रवादीबरोबरचे आपले संबंध ते कायम ठेवणार आहेत. तशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी ही दुहेरी भूमिका संभ्रम निर्माण करणारी असल्याचे बोलले जात आहे.