दक्षिण भारतातील चार भाषा (कन्नड, तेलुगु, तमीळ व मल्याळम) वगळता अन्य प्रादेशिक भाषिक चित्रपटात भोजपुरी भाषेत चित्रपटनिर्मिती करणे व्यावहारिकदृष्टय़ा सर्वाधिक फायद्याचे असल्याचे ‘चित्र’समोर आले आहे. विशेष म्हणजे, जवळपास सतरा ‘मराठी निर्मात्यां’नी भोजपुरी चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. मराठीपेक्षा तेच फायद्याचे दिसते. ‘गंगा देवी’ या भोजपुरी चित्रपटाचे निर्माते दीपक सावंत यांनी याबाबत ‘रोखठोक’पणे सांगितले, १९९४ साली निर्माण केलेल्या ‘आक्का’ या मराठी चित्रपटाने मला प्रचंड मन:स्ताप दिला. चित्रपट समजून न घेताच त्यावर टीका झाली, पण ‘गंगा’ या भोजपुरी चित्रपटापासून मी मार्ग बदलला आणि माझे भाग्य उजळले. त्यानंतर ‘गंगोत्री’ व आता ‘गंगा देवी’ या भोजपुरी चित्रपटांची निर्मिती केली. प्रत्येक चित्रपटासाठी मला अमितजी व जयाजी यांनी भरपूर सहकार्य केले. अमितजींची फक्त एकच अट आहे, त्यांच्या चित्रपट अथवा ‘कौन बनेगा करोडपती’ यांचे मेकअपसाठीचे वेळापत्रक सांभाळून मी भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करावी. मी तेच करतो.
दीपक सावंत यांनी मराठी व भोजपुरी चित्रपटांच्या निर्मितीच्या गणितावर बोलताना सांगितले, दोन्ही भाषांतील चित्रपटांसाठी साधारण दीड ते दोन कोटी रुपये खर्च येतो. मराठीत आशयप्रधान कसदार चित्रपटांना खूप पसंती मिळाली तरी त्याची फक्त चर्चाच तेवढी रंगते. प्रत्यक्ष चित्रपट पाहायला कधी तरी म्हणजे एखाद्या ‘काकस्पर्श’च्या वेळीच लोक येतात. त्यामुळे मराठी चित्रपटाच्या निर्मितीमधील गुंतवणूक वसूल करणे अवघड जाते. फक्त तेथे हुकमी शासकीय अनुदान मिळते इतकेच. दोन कोटींच्या सिनेमाचे फक्त ३० लाख मिळवायचे हे फक्त ‘वरकमाई’वाल्या निर्मात्यांनाच परवडते. उपग्रह वाहिनीच्या हक्काचाही मराठीतील व्यवहार फारसा सुखकारक नसतो. भोजपुरीत ‘मसाला चित्रपटांना पसंती मिळते. त्या चित्रपटाचे स्वरूप पाहून त्याची समीक्षा होते, असेही दीपक सावंत यांनी सांगितले. भोजपुरी चित्रपटामुळे आपण नावारूपास आल्याचाही त्यांना अभिमान आहे.
भोजपुरी चित्रपटांचे निर्मिती व्यवस्थापन सांभाळणारे शशिकांत सिंग याबाबत म्हणाले, मराठी चित्रपटांना स्वतंत्र वितरक मिळणे अवघड असल्याने निर्मात्यालाच मुंबईसह सर्वत्र धावपळ करावी लागते. याउलट भोजपुरी चित्रपटांना किमान पाच वितरण क्षेत्रात वितरक मिळत असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच निर्माता आर्थिक फायद्यात असतो. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब असे करता करता मुंबई व गुजरात येथे आता भोजपुरी चित्रपटाला वितरकांकडून चांगली किंमत मिळते. विशेष म्हणजे, काही मराठी माणसेच  भोजपुरी चित्रपटांच्या निर्मिती व वितरण या दोन्हींत आघाडीवर आहेत. योगेश कुलकर्णी, बाविस्कर, म्हात्रे यांचा याबाबत खास उल्लेख करायला हवा. भोजपुरी चित्रपटाचे मुंबईत बऱ्याच ठिकाणी मराठी माणसाच्या उत्तम सहकार्यानेच चित्रीकरण होते, शिवाय वसई, वाडा येथेही चित्रीकरण रंगते, असेही शशिकांत सिंग यांनी सांगितले. देशात विविध ठिकाणी बिहार व उत्तर प्रदेशच्या नागरिकांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे भोजपुरी चित्रपटांची सर्वत्र लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून येते.
राखी सावंत, दीपाली सय्यद अशा मदनिकांनी भोजपुरी चित्रपटांतून आयटेम डान्सचा फंडा नाचवला असून, मराठी चित्रपटांतील काही तारकांना भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मराठी निर्मात्यांकडून चांगल्या मानधनात ‘ऑफर’ असल्याचे समजते. 

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट