अवैध व्यवसायांना पाठीशी घालण्यात धन्यता मानणाऱ्या व गंभीर गुन्ह्य़ांचा तपास करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या नांदेड पोलिसांच्या रझाकारीचा अनुभव प्रतिष्ठित व्यावसायिक बलभीम रेणापूरकर यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी पहाटे घेतला. विमानतळ पोलिसांनी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या नातवाला केलेल्या मारहाणीने व्यथित झालेल्या ८५ वर्षीय वृद्धेने दोषींवर कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना साकडे घातले.
नांदेडमधील प्रतिष्ठित व सधन व्यावसायिक बलभीम रेणापूरकर यांचे सुपुत्र अमित नांदेडमध्ये कायद्याचे शिक्षण घेतात. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता ते बुलढाणा जिल्ह्य़ातल्या मेहकर येथून विवाहसोहळा आटोपून घरी परतले. मोटारीतून उतरताच विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी त्यांना अडविले. तुझ्या अंगावर काळा शर्ट कसा? तू कोण? एवढय़ा रात्री कुठून आला? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी आपली रझाकारी दाखवली. मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो. मी रेणापूरकरांचा मुलगा आहे. साहेब, माझे काय चुकले, तुम्ही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे का बोलता, अशी विचारणा केल्यानंतर गुन्हेगारांपुढे सपशेल नांगी टाकणाऱ्या विमानतळ पोलिसांचा पारा चढला. कोणतीही खातरजमा न करता त्यांनी कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या अमितला त्याच्या घरासमोरच अमानुष मारहाण केली. एवढेच नव्हे, तर त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे पोलिसांच्या वाहनातच पोलीस ठाण्यात आणले.
आपण केलेली कारवाई चुकीची आहे, असे लक्षात आल्यानंतर सकाळी पोलिसांनी त्याला विनाशर्त सोडले. एवढेच नव्हे, तर अमित रेणापूरकरला ‘पोलीस मित्र’ करण्याची तयारीही दर्शविली. पोलिसांच्या ‘रझाकारी’ ने अस्वस्थ झालेल्या अमितने ही कैफियत कुटुंबीयांसमोर मांडल्यानंतर शनिवारी त्याची आजी शकुंतला रेणापूरकर (वय ८५) यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. रेणापूरकर परिवाराला कोणतीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नाही. धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आमच्या परिवाराचे नाव असताना अशा पद्धतीने मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत श्रीमती रेणापूरकर यांनी संबंधित दोषींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक चिखले यांनी या प्रकरणाची चौकशी नांदेड शहर उपविभागाच्या पोलीस अधीक्षकांकडे सोपविली. चौकशी अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले.
विमानतळ पोलिसांनी अमितला केलेल्या मारहाणीचा त्याचे वडील बलभीम रेणापूरकर यांनी तीव्र निषेध केला. पोलीस यंत्रणा किती खालच्या तळाला गेली आहे, याचा अनुभव आम्ही घेतला. या प्रकरणी अखेपर्यंत कायदेशीर लढाई लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली. या संदर्भात विमानतळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘तू-तू, मैं-मैं’ झाली, अमितला मारहाणही झाली, पण त्याने पोलिसांशी उद्धट वर्तणूक केली. अमितला सकाळी सोडून दिले. घडलेला प्रकार गंभीर नाही.