प्राध्यापकांचा परीक्षेच्या कामावरील बहिष्कार संपला असला तरी, या आंदोलनामुळे विस्कळीत झालेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक अजूनही रूळावर आलेले नाही. त्यातच गेल्या १८ मे रोजी झालेल्या एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेमुळे त्या दिवशीचे तब्बल ४९ विषयांचे पेपर्स विद्यापीठाला पुढे ढकलावे लागले. आता या तारखेचे पेपर्स येत्या ७ जूनला होणार आहेत. नवीन वेळापत्रकाविषयी माहिती न पोहोचल्याने अभियांत्रिकीचे अनेक परीक्षार्थी इंजिनिअरिंग मॅथेमेटिक्स- १ आणि २ च्या प्रश्नपत्रिकांच्या परीक्षेला केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे दोन्ही परीक्षा आता जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील प्राध्यापकांसह राज्यातील प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. तब्बल ९४ दिवसांनंतर प्राध्यापकांनी बहिष्कार आंदोलन मागे घेतले. पण, तोपर्यंत अध्र्याअधिक परीक्षा पार पडल्या होत्या. प्राध्यापकांच्या बहिष्कार अस्त्रामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचाही प्रश्न निर्माण झाला होता. सुरुवातीच्या टप्प्यातील परीक्षा अमरावती विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लक्षात येईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरी सेवा (राज्य सेवा पूर्वपरीक्षा) १८ मे रोजी आल्याने या तारखेच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची पाळी विद्यापीठावर आली. या दिवशी सुमारे ४९ विषयांचे पेपर्स होते. हे पेपर्स आता नवीन वेळापत्रकानुसार येत्या ७ जून रोजी एकाच दिवशी घेतले जाणार आहेत. हे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला.
प्राध्यापकांच्या संपामुळे वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले होते. त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. बी.ई फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टर, तसेच बी.टेक (केमिकल इंजिनिअरिंग), (केमिकल टेक्नॉलॉजी), पॉलिमर (प्लास्टिक टेक्नॉ.), बी.टेक्स्ट इंजिनिअरिंगच्या परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रश्नपत्रिकांची वेळ बदलवण्यात आल्याने अनेक परीक्षार्थी सुधारित वेळापत्रकानुसार इंजिनिअरिंग मॅथ-१ आणि २ च्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी या प्रश्नपत्रिकांची पुनर्परीक्षा पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. इंजिनिअरिंग मॅथ-१ चा पेपर ३ जूनला, तर इंजिनिअरिंग मॅथ-२ चा पेपर ५ जूनला सकाळी ९ ते १२ या वेळात होणार आहे.