लोकसभेचा उमेदवार जनतेतून ठरविण्याच्या प्रयोगात काँग्रेसने लातूर मतदारसंघाचा समावेश केल्यानंतर पक्षाच्या आदेशानुसार गुरुवारी या दृष्टीने मतदार यादी तयार करण्याच्या कामास वेग देण्यात आला.
हे काम वेगाने सुरू झाले असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे यांनी दिली. लोकसभेचा उमेदवार निवडण्यासाठी मतदारसंघातील आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व पूर्वीच्या कालावधीतील पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य, महिला काँग्रेस, एनएसयूआयचे पदाधिकारी-सदस्य, काँग्रेसचे सरपंच अशी मतदारांची मोठी यादी आहे. मतदारांची यादी तयार झाल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल. पक्षाचे समन्वयक प्रत्यक्ष येऊन ही यादी तपासतील. नंतर उमेदवार निवडीसाठी मतदानाची तारीख पक्षाच्या वतीने जाहीर होईल. त्यानंतर पारदर्शी पद्धतीने मतदार उमेदवार निवडून देतील. उमेदवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असायला पाहिजे, ही प्राथमिक अट आहे.
दरम्यान, पक्षाच्या या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळण्याची संधी चालून आली आहे. चार महिन्यांपासून गुडघ्याला बािशग बांधून लातूरमधून आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करणाऱ्या केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांचे मनसुबे हवेत विरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विद्यमान खासदार जयवंत आवळे यांनी स्थानिक मंडळींना उमेदवारी मिळणार असेल तर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आधीच पत्रक प्रसिद्धीस देऊन सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा पक्षाचे तिकीट मिळावे, यासाठी ते पक्षातील मतदारांवर कसा प्रभाव पाडणार? यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
काँग्रेसने लोकातून उमेदवार निवडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे विरोधकांना सोपा वाटणारा विजय हा आता अवघड जाईल, अशी चर्चाही राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू झाली आहे.