वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अनेक व्यक्ती, संस्था विविध उपक्रमांतून प्रयत्नशील असतात. परंतु अक्षरधारासारख्या ग्रंथ प्रदर्शनांमुळेच खऱ्या अर्थाने वाचनसंस्कृती वृद्धिंगत होत असते, असे मत प्रसिद्ध लेखक जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा व रोहन प्रकाशन यांच्या वतीने बलवंत वाचनालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या निमित्त अध्यक्ष म्हणून डॉ. दादा गोरे व प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलिक अतकरे उपस्थित होते. वाचाल तर वाचाल उक्ती लक्षात ठेवून आपण अधिकाधिक वाचले पाहिजे. वाचनामुळे जीवन समृद्ध होते, असे दीक्षित यांनी सांगितले. वाचनामुळे आपले जीवन तर समृद्ध होतेच, पण आपले राज्य, देशही समृद्ध होऊ शकतो, असे डॉ. गोरे म्हणाले. अक्षरधारा ग्रंथप्रदर्शनात लहानांपासून ज्येष्ठ वाचकांपर्यंत विषयानुसार पुस्तके मांडण्यात येतात. एकप्रकारे औरंगाबादकरांसाठी ही अक्षरपर्वणीच आहे, असे अतकरे यांनी सांगितले. अक्षरधाराचे व्यवस्थापक श्रावण राठोड यांनी मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. विकास रायमाने यांनी सूत्रसंचालन केले.