डॉ. भाऊसाहेब कणसे यांनी लिहिलेले ‘अस्सल माणदेशी’ हे पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने माणदेशी माणूस तुम्हाला कळेल असे प्रतिपादन माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.
डॉ. कणसे यांच्या ‘अस्सल माणदेशी’ या पुस्तकाचे प्रकाशन १०४ वर्षीय कृष्णा केवटे (दादा) या जेष्ठ नागरिकांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
चेतना सिन्हा म्हणाल्या की, डॉ.  भाऊसाहेब कणसे यांनी लिहिलेले पुस्तक ‘अस्सल माणदेशी’ हे वाचल्यानंतर मला कुकुडवाडच्या माळरानावरचा बाजा बैजा कळला. तो गरिबांना लुटणाऱ्यांचा कर्दनकाळ होता. या पुस्तकातील सारी व्यक्तिचित्रे डॉ. कणसेंनी हुबेहूब उभी केली आहेत. वाचकांनी हे पुस्तक वाचल्यावर माणदेशी माणसाविषयी पूर्णपणे उलगडा होईल. दरम्यान, यावेळी आपल्या आठवणीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्रातला शेतकरी त्याच्या जनावरांच्या चाऱ्यासाठी रांगेत उभा राहिलेला बघून मला फार वाईट वाटले. मी लाईन बंद केली आणि त्यांना जागेवर जनावरांच्या समोर वैरण नेऊन दिली. दुष्काळात तीन हजार बैलांची बेंदराच्या दिवशी समजून मिरवणूक काढली.
डॉ. भाऊसाहेब कणेस म्हणाले की, माणदेशी माणूस दरवर्षी दुष्काळाला तोंड देणाऱ्या बिलिंग्याच्या झाडासारखा हिरवागार असतो, बिलिंग्यासारखाच तोही काटेदार असतो. वाटे जाणाऱ्याला काटय़ासारखा टोचतो. त्याचं हृदय निवडुंगाच्या लाल बोंडासारखं असते, पण त्यालाही कूस असते. इतक्या सहजासहजी त्याच्या हृदयाला हात घालता येत नाही. त्याचं मन बिलिंग्याच्या पिवळय़ा फुलासारखं नाजूक असतं आणि आत्मा फुलातल्या मधल्या लाल देठासारखा असतो, असा हा माणदेशी माणूस मी पुस्तकरूपाने वाचकांपुढे उभा केला आहे.