सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील शरदचंद्र पवार मूकबधिर मतिमंद विद्यालयात मुलीवर तिघांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाने या विद्यालयाची मान्यता रद्द करून येथील विद्यार्थ्यांचा इतर शाळेत समावेश करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
या विद्यालयात कुठल्याही भौतिक सुविधा नसल्याच्या वारंवार तक्रारी होऊनही संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. मात्र, १३ जानेवारी रोजी शाळेत ७ वर्षांच्या मुलीवर तिघांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने खडबडून जागे होत संबंधित विभागाच्या अपंग कल्याण कार्यालयाने या विद्यालयाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या विद्यालयात ४० विद्यार्थ्यांना मान्यता आहे. यात २५ अनुदानित, तर उर्वरित १५ विनाअनुदानित विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली. जि. प. समाजकल्याण अधिकारी ए. बी. कुंभारगावे, तसेच बी. एच. वाकडे यांच्या पथकाने १५ जानेवारीला शाळेला भेट देऊन पाहणी केली असता शाळेला टाळे ठोकल्याचे आढळून आले. मात्र, एका खोलीत ११ विद्यार्थी थांबले होते. विशेष म्हणजे त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली नव्हती. विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकून पथकाने विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.
पथकाला या शाळेत भौतिक सुविधा नसल्याचे दिसून आले. तशी नोंदही घेतली. अपंग कल्याण आयुक्त कार्यालयाकडे तसा अहवाल पाठविला. त्याची गंभीर दखल घेत आयुक्त कार्यालयाने शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेशही निर्गमित केले. समाजकल्याण विभागाला हा आदेश प्राप्त झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, संस्थेची मान्यता रद्द झाल्यामुळे शाळेतील शिक्षकांची सेवा संपुष्टात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. ज्या ठिकाणी रिक्त जागा होतील, तेथे ज्येष्ठतेनुसार त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे समजते. शाळेची मान्यता रद्द झाल्याने येथील १८ विद्यार्थ्यांना इतर शाळेत समावून घेण्याबाबतच्या सूचना सर्व मूकबधिर व मतिमंद विद्यालयांना कळविल्या आहेत. अशा शाळांमध्ये हे विद्यार्थी आल्यास त्यांना प्रवेश देण्याच्या सूचना दिल्याची माहितीही कुंभारगावे यांनी दिली.