नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था सातत्याने नागरी हितासाठी बांधील असतात. नगरपालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या प्राथमिक शिक्षण मंडळासारख्या प्राधिकरणाकडून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे काम होत आहे. जयसिंगपूर नगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रशंसनीय आहे. अशा चांगल्या कामाच्या पाश्र्वभूमीवर शिक्षण मंडळे बरखास्तीच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाने शिक्षण मंडळ बरखास्तीच्या निर्णयाचा फेरविचार केला पाहिजे, असे प्रतिपादन जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर यांनी केले.
जयसिंगपूर नगरपरिषद प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम झाला. यानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार झाला. नगराध्यक्षा स्वरूपा पाटील यड्रावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सांगलीच्या वसंतदादा पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘आपलं आरोग्य आपल्या हाती’ या विषयावर डॉ. पाटील यांचे व्याख्यान झाले. प्रेमलता महादेव राजमाने, मेघन राजन देसाई, शैलजा विजय देवकुळे, यांना आदर्श शिक्षक पुरस्कार नगराध्यक्षा यड्रावकर व डॉ. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाले. शिक्षण मंडळाचे निवृत्त प्रशासन अधिकारी एस.के.निकम यांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वतीने मेघन देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण मंडळाचे सभापती राजकुमार पाटील ऐतवडेकर यांनी स्वागत केले. शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी व्ही.ए.कांबळे यांनी आभार मानले.