काही वर्षांपूर्वी पावसाने पाठ फिरविल्याने पाण्याची चणचण भासू लागली आणि महापालिकेने नव्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली. मात्र समुद्र आणि खाडीलगतच्या इमारतींमधील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात खारे पाणी मिसळू लागल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे काही भागांतील इमारतींना या सक्तीतून मुक्ती देण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.
पावसाने पाठ फिरविल्यामुळे २००९-१० मध्ये मुंबईत पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली होती. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील साठा कमालीचा खालावल्याने मुंबईकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु २०१० मध्ये मुबलक पाऊस पडला आणि मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली. मात्र दरम्यानच्या काळात समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यापासून सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरण्यापर्यंत अनेक विषयांवर चर्वितचर्वण झाले. त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचाही समावेश होता. नव्याने उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले. तसेच जुन्या इमारतींमध्ये हा प्रकल्प राबविण्याचाही विचार झाला. परंतु दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळींमध्ये हा प्रकल्प उभारणे अवघड असल्याने तो विचार मागे पडला.
नव्या इमारतींना सक्ती करताच अनेक विकासकांनी हा प्रकल्प आपापल्या टॉवर्समध्ये उभारला, परंतु काही प्रकल्प हे केवळ पालिकेला दाखविण्यापुरतेच होते. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची पाहणी करण्याची पालिकेची सक्षम यंत्रणा नसल्याने विकासकांचे फावले. काहींनी मात्र प्रामाणिकपणे हे प्रकल्प उभारलेही. सध्या समुद्रकिनारा आणि खाडीलगत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. या इमारतींमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यात आले आहेत. मात्र काही इमारतींच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यात खारे पाणी मिसळल्याचे आढळून आले आहे.
समुद्र अथवा खाडीचे पाणी मोठय़ा प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पात मिसळत असल्याने पालिका अधिकारीही चिंतित झाले आहेत. खाऱ्या पाण्यामुळे भूगर्भातील गोडय़ा पाण्याचे स्रोत आणि साठय़ांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने उपाय योजणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून काही विभागांत रेन वॉटर हार्वेस्टिंगवरील सक्ती उठविण्याचा विचार सुरू आहे, असे पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.