इचलकरंजीच्या यंत्रमाग कामगारांच्या आंदोलनाच्या इतिहासात विक्रमी कालावधीच्या संपाची नोंद करीत तब्बल ३८ दिवसांनंतर सुवर्णमध्य निघाला अन् शहरवासीयांचे तोंड गोड झाले. यंत्रमाग कामगारांना प्रथमच ४२ टक्के इतकी मजुरीवाढ मिळाली आहे. त्यांच्या मजुरीत दरमहा सरासरी एक ते दीड हजार रूपयांची वाढ होणार आहे. शहरातील सर्व कामगारांना महिन्याला सुमारे दीड ते दोन कोटी रूपये मजुरीवाढीच्या रूपाने जादा मिळणार आहेत. महागाईशी मुकाबला करताना मेटाकुटीला आलेल्या सुमारे ५० हजार श्रमिकांसाठी आशादायक चित्र या निमित्ताने पहायला मिळाले आहे.    
इचलकरंजीमध्ये सुमारे सव्वा लाख साध्या यंत्रमागावर अहोरात्र कापड विणण्याचे काम यंत्रमाग कामगार करीत असतात. या कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा पाच दशकापूर्वीच लागू झाला आहे. पण त्याची अंमलबजावणी कोठेही होत नाही. उलट कामाच्या प्रमाणात (जॉबवर) त्याला मजुरी स्वीकारावी लागते. १९८४ साली किमान वेतनासाठी सुमारे २८ दिवस कामगार संपात उतरले होते. माजी आमदार कॉ.के.एल.मलाबादे यांनी या आंदोलनात तडजोड घडवितांना ५२ पिकाला प्रतिमीटर २६ पैसे इतकी मजुरी मिळवून घेतली होती. तेंव्हाच्या काळात ती मजुरी जास्त असल्याने कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला होता. त्यानंतर दर तीन वर्षांनी मजुरीमध्ये वाढ होत राहिली. तीन वर्षांपूर्वी मजुरीवाढीचे आंदोलन झाले तेंव्हा ५२ पिकाला साडेछपन्न पैसे मजुरी मिळाली होती. मात्र मधल्या तीन वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले. महागाईने तर कळसच गाठला. अशा स्थितीत यावेळच्या मजुरीवाढीच्या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. कामगारांच्या अकरा संघटना संयुक्त कृती समितीच्या नांवाखाली एकत्रित आल्या. दरमहा १० हजार रूपये पगार किंवा दररोज ४०० रूपये मजुरी मिळावी, अशी त्यांची मुख्य मागणी होती. याच मागणीसाठी लढा देताना कामगारांनी अभूतपूर्व सनदशीर मार्गाच्या आंदोलनाची प्रचिती घडवितांना विक्रमी ३८ दिवस कामबंद आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डझनावारी बैठका होऊनही निर्णय झाला नाही.अखेर कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पाचव्या बैठकीत या प्रकरणावर तोडगा निघाला आणि पुन्हा एकदा इचलकरंजीतील यंत्रमागाचा खडखडाट सुरू होण्याचा मार्गही खुला झाला. यापुढे यंत्रमाग कामगारांना ५२ पिकाला ८७ पैसे मजुरी मिळणार असून दिवाळीचा बोनस १६.६६ टक्के मिळणार आहे. कामगारांची मजुरी सरासरी ४२ टक्के इतकी वाढली असल्याने त्याला दर आठवडय़ाला दोनशे ते अडीचशे जादा पगार मिळणार आहे. त्याच्या महिन्याच्या उत्पन्नात सुमारे १५०० रूपयांची भर पडणार आहे. शहरातील सर्व कामगारांचे वाढीव उत्पन्न लक्षात घेता सर्वाना मिळून सुमारे २ कोटी रूपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. या मजुरीवाढीमुळे सुमारे ५० हजार कामगारांना चांगला दिलासा मिळाला आहे. शिवाय महागाई भत्त्याप्रमाणे सातत्याने त्याच्या मजूरीत वाढ होणार असल्याने यापुढे वस्त्रनगरी इचलकरंजीत यंत्रमाग कामगारांच्या आंदोलनाची धग फारशी जाणवणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय श्रेयवादात सापडलेल्या एका संयमाची कसोटी पाहणाऱ्या आंदोलनाचा सुखान्त झाला असून त्यामुळे उद्योगनगरीचे तेज पुन्हा एकदा खुलणार आहे.

रेयवादाची साठमारी. यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा प्रश्न मिटवितांना त्याला राजकीय श्रेयवादाची किनार लागली होती.हा प्रश्न माझ्या प्रयत्नाने सुटला हे दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधी, यंत्रमागधारक प्रतिनिधी व कामगार नेत्यांत चढाओढ लागली होती. आंदोलनाला पंधरा दिवस झाल्यानंतर कामगारांना ८२ पैशापेक्षा अधिक मजुरी द्यावी,असा प्रस्ताव ठेवत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी बाजी मारली. तर प्रश्न सुटत नसल्याने रोजच्याच चर्चेला कंटाळून आमदार सुरेश हाळवणकर यांनी ठिय्या आंदोलन सुरू करून गड सर केला. तर सलग चार बैठकीत अपयशी ठरलेले कामगारमंत्री मुश्रीफ हे पाचव्या बैठकीत सुवर्णमध्य काढण्यात यशस्वी ठरल्याने त्यांच्याकडे श्रेयाचा काटा झुकला. निर्णय प्रक्रियेत मुश्रीफ यांना आणण्यात पडद्यामागे हालचाली करणारे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा चाणाक्षपणाही लाभदायक ठरला. हे आंदोलन नेतृत्वाची कसोटी पाहणारे होते. तसेच ज्याच्या त्याच्या पदरात यश-अपयशाचे माप टाकणारेही ठरले.