कृषीपंपधारक शेतकऱ्यांकडून वीज वसुलीची मोहीम महावितरणने हाती घेतली असून अमरावती परिमंडळातील शेतकऱ्यांकडून आतापर्यंत १ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांची वसुली केली, असे वीज मंडळाच्या निवेदनात सांगण्यात आले आहे.     
कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी वापरलेल्या विजेचा पैसा महावितरणकडे भरावा, यासाठी मोहीम राबविली. त्यात शेतकऱ्यांनी उपरोक्त रकमेचा भरणा वीज मंडळाकडे केला आहे. ज्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी वीज रक्कम भरली नाही त्यांच्याविरुद्ध महावितरणने वसुलीची मोहीम तीव्र केली व ही रक्कम भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
अकोला १७ लाख ४३ हजार, अमरावती २१ लाख ६२ हजार, बुलडाणा ३७ लाख ३० हजार, वाशीम १० लाख ८८ हजार व यवतमाळ ४२ लाखाचा भरणा कृ षी ग्राहकांनी महावितरण कंपनीकडे केला आहे. एप्रिल २०१२ ते जून २०१३ या कालावधीतील हा भरणा आहे.
मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक झाली असून त्यात असे निश्चित करण्यात आले की, पाच त्रमासिक बिलांपैकी दोन त्रमासिक बिले तातडीने भरणे आवश्यक आहे व त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
उर्वरित ३ महिन्यांची राशी म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्याचा भरणा तीन समान हप्त्यात करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. जे वीज ग्राहक शेतकरी आहेत त्यांनी जर हा भरणा केला नाही तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करेल, असेही सूचित करण्यात आले आहे.