केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पाने गुरूवारी कोल्हापूरकरांची निराशा केली. बन्सल एक्सप्रेसने कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सला चकवा दिला आहे. यामुळे कोल्हापूरवासीयांत खुशीपेक्षा गम जास्त असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
रेल्वे अर्थसंकल्पाने कोल्हापूरची कशाप्रकारे निराशा केली आहे याचे विश्लेषण करतांना ‘कॉमन मॅन’चे बाबा इंदूलकर यांनी म्हटले आहे की, रेल्वेची चाके बनविण्यासाठी हरियानामध्ये सोनपथ येथे नवीन कारखान्याची उभारणी केली,परंतु कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधून रेल्वे खात्याला नवीन चाके तयार करून दिली जात असतांना असा प्रकल्प कोल्हापूरमध्ये का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.अनेक ठिकाणी दुहेरी रेल्वे मार्ग मंजूर, मात्र कोल्हापूर या रहदारीच्या मार्गावर नवीन दुहेरी मार्ग प्रस्तावित न केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अनेक डिग्री व डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज, एमबीए संस्था, आयटीआय कोल्हापूरमध्ये असतांना रेल्वे रिसर्च इन्स्टिटय़ूट व रेल्वे ट्रेनिंग अॅकॅडमी कोल्हापूरमध्ये येत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. १७०० पेक्षा जास्त देशातील रेल्वे क्रॉसिंग बंद करणार व पर्यायी व्यवस्था उभी करणार; मग हातकणंगले, इचलकरंजी व उचगाव लोणार वसाहतीतील क्रॉसिंगचे काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनेक वर्षांची रेल्वे फाटक क्र.१ येथील पादचारी फूट ओव्हरब्रिजच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये अनेक भक्तिस्थळे व धर्मस्थळांसाठी नवीन रेल्वे गाडय़ा मंजूर केल्या आहेत तर मग कोल्हापूर हे करवीर पीठ व महालक्ष्मी देवस्थानसारख्या स्थळांसाठी रेल्वे गाडय़ा मंजूर न केल्याबद्दल इंदूलकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नाराजी व्यक्त केली आहे.