रासायनिक खतांचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी गांडूळ खत, जिवाणू संवर्धकांच्या वापराला प्रोत्साहन दिल्याचे कृषी विभागामार्फत सातत्याने सांगितले जात असले, तरी गेल्या दशकभरात अमरावती विभागात रासायनिक खतांचा वापर २ लाख मेट्रिक टनाने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्याचे दावेदेखील फोल ठरले आहेत.
रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने कृषी विभागामार्फत जिवाणू संवर्धकाची पाकिटे आणि जिप्सम उपलब्ध करून देण्यात येत आहे. पण, त्यातूनही फारसा फायदा होऊ शकलेला नाही. अमरावती विभागात तर शेणखताचाही तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात चांगल्या उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. २००३-०४च्या खरीप हंगामात अमरावती विभागात ४ लाख ८८ हजार मे. टन रासायनिक खतांची मागणी होती. चालू हंगामात ही मागणी ६ लाख ४० हजार मे. टनापर्यंत पोहोचली आहे. विभागात आतापर्यंत १ लाख ५० हजार मे. टन खताचा पुरवठा झाला आहे. गेल्या दहा वर्षांत रासायनिक खतांचा वापर कमी न होता तो अधिक वाढत चालल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील इतर विभागांपेक्षा अमरावती विभागात रासायनिक खतांचा वापर अधिक आहे. महिनाभरापूर्वी रासायनिक खतांच्या किमती गोणीमागे ५० ते २०० रुपयांपर्यंत कमी झाल्याचे सांगण्यात आले होते. पण, खत कंपन्यांनी वर्षअखेरीस खताच्या किमती वाढवून त्या नंतर कमी केल्याने शेतकऱ्यांची या प्रकरणात दिशाभूल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  
 डीएपी खताच्या गोणीची किंमत गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीला ५२५ रुपये होती. ती १२६० रुपयांवर पोहोचली. यंदा डीएपीची किंमत १ हजार १०० पासून आहे. इतर रासायनिक खतांच्या किमतीतही दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महाग खतांचा वापर करावा की नाही, या संभ्रमात शेतकरी आहेत. खतांचा वापर कमी झाल्यास त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती आहे. यंदा अमरावती विभागात शेतकऱ्यांनी कपाशीपेक्षा सोयाबीनला अधिक पसंती दर्शवली आहे. सोयाबीनचे बियाणे मुबलक स्वरूपात उपलब्ध असले, तरी काही विशिष्ट वाणांच्या आग्रहामुळे बाजारात अचानक तुटवडा निर्माण होतो आणि ते बियाणे चढय़ा किमतीत विकले जाते. अमरावती विभागात यंदा ७ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, तर १० लाख ९८ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीच्या लागवडीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. सर्व प्रकारच्या बियाणांसाठी कृषी विभागाने महाबीजकडे ३ लाख १७० क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडे ३ लाख ८९ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली होती. त्यापैकी साडेपाच लाख क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. विभागात संकरित कपाशीच्या बियाणांची अधिक मागणी आहे.

* बियाणांची उपलब्धता समाधानकारक – इंगोले
यंदा बियाणे आणि खतांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात असून सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. परिणामी, काही विशिष्ट वाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण, तो किरकोळ स्वरूपाचा राहील, अशी माहिती अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघाचे अध्यक्ष विलास इंगोले यांनी ‘लोकसत्ता’ ला दिली. खतांच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढल्याने, तसेच शेणखत मिळणेही कठीण झाल्याने शेतकरी इतकी महाग खते वापरतील का, याची शंका वाटत असल्याचे विलास इंगोले यांनी सांगितले.