सर्वच वाहनांना रिफ्लेक्टर अत्यावश्यक असूनही त्याकडे केलेले दुर्लक्ष वाहन चालकाच्या प्राणावर बेतू शकते. ‘रिफ्लेक्टर’चे महत्त्व असल्याची जाणीव असूनही वाहतूक पोलिसांनी अद्याप मोहीम सुरू केलेली नाही.
अपघात कमी करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येत असले तरी वाहनांच्या मागच्या बाजूचे दिवे (टेल लॅम्प) व रिफ्लेटर या अतिशय किरकोळ पण सर्वाधिक अपघातास कारणीभूत वस्तूकडे सर्वाचेच दुर्लक्ष होत आहे. महामार्ग असो वा शहरातील रस्ते, पन्नास टक्क्यांहून अधिक वाहनांचे टेल लॅम्प बंद असतात. हा विषय गंभीर असला तरी परिवहन व पोलीस खाते त्याबाबत फारसे गंभीर नसल्याने अपघातांमध्ये अनेकांचे नाहक बळी जात आहेत. ग्रामीण भागात किंवा शहरातही रात्री जाताना बहुतांश वाहनाचे टेल लॅम्प बंद असल्याचे दिसते. वाहनाच्या दोन्ही बाजूंनी किंवा मोठे वाहन असल्यास चारही बाजूंनी रिफ्लेक्टर किंवा रेडियम पट्टी लावणे अत्यावश्यक आहे. टेल लॅम्प बंद असलेल्या व रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना मागील बाजूने दुसऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जकात नाक्यावर किंवा शहरात चौरस्त्यावर वाहन थांबते. तेव्हा टेल लॅम्प किंवा रिफ्लेक्टरची तपासणी करायची व ते बंद असतील तर तातडीने दंड आकारून ते सुरू करून देण्याची वा बसवण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. नागपुरात काही वर्षांपूर्वी रेडियम पट्टी लावून देण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली होती. काही दिवस ती चालली. पुन्हा जैसे थे. वर्धा मार्गावर गोरक्षण ते विमानतळ, सेमिनरी हिल्सजवळ तसेच विधान भवनाच्या याच ठिकाणी रिफ्लेक्टर गेल्यावर्षी लावले होते. केवळ विधान भवनाच्या आत ते शाबुत आहेत. इतर ठिकाणी ते दिसतच नाही.
नागपूर शहरात गेल्या वर्षी १ हजार २६५ अपघात घडले. त्यापैकी २९८ प्राणांतिक, ४०९ गंभीर, ४९३ किरकोळ तर ६५ अपघात अत्यंत किरकोळ होते. २९८ प्राणांतिक अपघातांमध्ये २५५ पुरुष व ५५ मुली-महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये ९९० पुरुष तर २४७ महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागाचे चित्रही यापेक्षा वेगले नाही. रस्त्यात ट्रक उभेराहत असल्याने इतर वाहनांना जायला जागा कमीच मिळते. विशेषत: रात्रीच्यावेळी संकेतदर्शक दिवे न लावल्याने मागून येणारी वाहने त्यावर आदळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर माजी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्यांच्या कार्यकाळात वाहतूकदारांना सोबत घेत अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने ट्रक व इतर वाहनांवर रेडियम पट्टी लावण्याची मोहीम राबविली. बुटीबोरीत त्यांनी स्वत: एका ट्रकवर रेडियम पट्टी लावली. ग्रामीण पोलिसांनी रिफ्लेक्टरचे महत्त्व ओळखले. शहर वाहतूक पोलिसांना त्याची जाणीव असली तरी अशी मोहीम घेण्याची गरजच नाही असे दिसते. त्यापेक्षा वाहन चालकांनीच सतर्क राहून वाहनांचे रिफ्लेक्टर सुस्थितीत ठेवण्याची गरज आहे.