कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून चित्रनगरीच्या सर्वागीण विकासासाठी बृहत आराखडा तयार करून घेण्याची कार्यवाही महामंडळाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना पाठविलेल्या पत्रात दिली आहे.     
कोल्हापूर जिल्ह्य़ातील विविध बाबींच्या प्रलंबित विकासाबाबत खासदार मंडलिक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. यामध्ये कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रश्नही समाविष्ट केलेला होता. कोल्हापूरचा उल्लेख कला क्षेत्रामध्ये कलानगरी म्हणून आवर्जून केला जातो. ही कलानगरी चित्रपटसृष्टीची पंढरी आहे. कोल्हापूर चित्रनगरीचे पुनरुज्जीवन हा कलाक्षेत्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून त्याचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली होती.    
याबाबत खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीला अनेक वर्षे उपेक्षेचा शाप आहे. कोल्हापूरचा परिसर चित्रीकरणासाठी योग्य असून अनेक नामांकित कलाकार उदयास आले आहेत. मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी हक्काचे स्थान असणे आवश्यक आहे. त्यासाठी चित्रनगरीचे गतीने पुनरुज्जीवन व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.