मांढरदेव यात्रेच्या पार्श्र्वभूमीवर येथे उभारण्यात आलेल्या पार्किं ग व प्लाजा इमारतीच्या उद्घाटनाची वाट न पाहता तेथील पाणीपुरवठा जोडून यात्रा काळासाठी भाविकांना स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची सूचना वाईच्या प्रांताधिका-यांनी व तहसीलदारांनी मांढरदेव ट्रस्ट प्रशासनाला दिल्या आहेत.
    यावर्षीची मांढरदेव येथील काळूबाईची यात्रा १५ ते १७ जानेवारीदरम्यान होत आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता तेथे स्वच्छतागृहाचा प्रश्न उभा राहतो. परंतु २००५ च्या दुर्घटनेनंतर येथील भाविकांच्या सोयीसुविधांसाठी पर्यटन अनुषंगाने केंद्र शासनाने सहा कोटीचा निधी अपलब्ध करून दिला असून बाकीची रक्कम राज्य शासनाने दिली आहे. त्याअंतर्गत याठिकाणी मंदिर परिसरातील दुकानांचे पुनर्वसन होणार असून या ठिकाणी भाविकांसाठी स्वच्छतागृह व अंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जात असून येथे रस्ता, पाणी, वीज आदी सुविधा बाकी आहेत. परंतु तत्पूर्वी यात्रेच्या पार्श्र्वभूमीवर भाविकांची व विशेषत महिलांची जास्त कुचंबना होते. यासाठी शासनाचे प्रमुख अधिकारी व प्रातांधिकारी सूरज वाघमारे व तहसीलदार सुनिल चंदनशिवे यांनी मांढरदेव यात्रा परिसर व मंदिर परिसराची संयुक्त पाहणी केली. तेव्हा त्यांनी मांढरदेव ट्रस्टच्या प्रशासनाला या ठिकाणी किमान यात्रा काळापुरते तरी पाणी सोडावे, इमारतीचया उद्घाटनाची वाट पाहू नये म्हणजे किमान पातळीवर काही भाविकांना तरी हे शौचालय वापरता येईल असे सांगितले.