नागपूर शहराचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांना धमकीचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली असून हे पत्र पाठविणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.
सर्जेराव शेळके हे त्यांच्या अमरावती मार्गावरील कार्यालयात बसतात. दोन-तीन दिवसांपूर्वी ते कार्यालयात बसले असताना रोजच्या टपालातून एक पोस्ट कार्ड आले. पत्र लिहिणाऱ्याने शेळके यांच्या नावे अरेरावी आणि एकेरी भाषेत मजकूर लिहिला आहे. शिस्तबद्ध अधिकारी म्हणून सर्जेराव शेळके ओळखले जातात. कार्यालयीन शिस्तीचा एक भाग म्हणून त्यांनी अनेक निर्णय घेतले. मात्र, त्यामुळे हा पत्र लेखक संतापला असल्याचे पत्रातील मजकूर व या भाषेवरून स्पष्ट होते. या पत्रातून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे तसेच ते पोलिसांना देण्यात आले असल्याचे शेळके यांनी सांगितले. पोलीस मात्र यासंदर्भात तक्रार आली नसल्याचे सांगत आहेत.
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला होता. त्यामुळे वाहन धारकही त्रस्त झाले होते. त्यामुळे शासनाने दलालांना हद्दपार केले असून त्यांना राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली आहेत. परिणामी रोजीरोटी हिरावली गेल्याने राज्यातील हजारो दलाल संतप्त झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर धमकी देणारा कुणी दलाल तर नाही ना, अशी शंका आरटीओ वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्याच आठवडय़ात अमरावती मार्गावरील प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात जप्त केलेल्या वाहनांना कुणीतरी आग लावली होती. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.