‘केबीसी’ कंपनीच्या भूलथापांना बळी पडून आयुष्यभराची पुंजी गमाविणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांच्या नाते-संबंधांमध्ये तंटे निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. पतीला न सांगता गुंतवणूक करणाऱ्या महिला असो की शेतजमीन विकून वडिलांचा रोष पत्करणारी मुले असोत. इतकेच नव्हे तर, केबीसीच्या सांगण्यावरून इतर नातेवाइकांचे पैसे स्वत:च्या नावावर गुंतविणारे असो.. अशा अनेकांवर आपल्या रक्ताच्या नात्याला पारखे होण्याचा प्रसंग ओढवला आहे. मैत्री वा नातेसंबंधात आर्थिक व्यवहार नको, असे नेहमीच सांगितले जाते. कारण, अशा व्यवहारात काही अडचणी उद्भवल्या की, नातेसंबंधाची वीण उसविण्यास वेळ लागत नसल्याचा दाखला दिला जातो. त्याची शब्दश: अनुभूती सध्या केबीसीतील अनेकजण घेत असून गुंतवणुकीची ही चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.
‘केबीसी’च्या संचालकांनी चार वर्षांत वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापून अफलातून योजनांचा भूलभुलैया तयार केला. या योजना पंचक्रोशीत पोहोचविण्यासाठी दलालांचे मोठे जाळे तयार केले. त्यांना दलालीसोबत बक्षिसांची लालूच दाखविली गेली. स्थानिक दलालांवर विश्वास ठेवत आणि केबीसीचे भव्यदिव्य मेळावे पाहून भान हरपलेले हजारो नागरिक-महिला या योजनांकडे आकर्षित झाले. त्याकरिता पैसे उभे करताना विविध मार्ग अनुसरले. काही महिलांनी पतीला अंधारात ठेवत दागिने गहाण टाकले तर कोणी इतर नातेवाइकांकडून उधारउसनवारी केली. काहींनी खासगी सावकारांकडून पैसे घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. कुटुंबातील तरुणांनी ज्येष्ठांना अंधारात ठेवून शेतीवर कर्ज उचलले तर काही प्रकरणात आई-वडिलांनी मुलीचे लग्न वा मुलाच्या भवितव्यासाठी जमविलेली संपूर्ण पुंजी तिप्पट करण्याच्या नादात गुंतविली. पत्नीच्या सल्ल्यानुसार काहींनी आपला खिसा रिता केला. अनेकांनी प्रलोभनांना बळी पडून आपल्या नातेवाइकांना पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. केबीसी संचालकाच्या सल्ल्यानुसार काही गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाइकांचे पैसे स्वत:च्या नावावर गुंतविले. कंपनी बंद पडून पैसे बुडाल्याचे समजल्यानंतर या सर्वाना नातेवाईक व आप्तेष्टांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
कुटुंबातील ज्या व्यक्तीने पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला, त्याच्यावर या सर्वाचे खापर फोडले जात आहे. ज्या महिलांनी पतीला न सांगता गुंतवणूक केली, त्यांच्यासमोर गहाण ठेवलेले दागिने सोडवायचे कसे, हा प्रश्न आहे. ज्यांनी पत्नी वा इतर नातेवाइकांच्या सल्ल्यावरून गुंतवणूक केली, ती दाम्पत्ये अन् नातेवाइकांमध्ये कलह सुरू झाला आहे. वडनेर भैरवच्या एका वृद्धाने केबीसीमध्ये ८६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आयुष्यभर मोलमजुरी करून हा पैसा त्यांनी जमविला होता. ८६ हजाराचे अडीच वर्षांत सहा लाख रुपये मिळतील, असे सांगण्यात आले. या प्रलोभनाला बळी पडून त्यांनी दोन्ही मुलांना काही न सांगता आपली पुंजी गुंतवली. हा घोटाळा उघडल्यानंतर वडिलांचे पैसे बुडाल्याची बाब मुलांना समजली. हे काय केले तुम्ही, असे सांगत मुले आता जेवणही देण्यास तयार नसल्याची खंत वडिलांनी व्यक्त केली. केबीसी घोटाळ्याने नातेसंबंधांवर झालेल्या आघाताची अशी अगणित उदाहरणे पुढे येत आहेत.