शोध तथागत बुद्धांच्या पदचिन्हांचा’ साकार
हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या गंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा छायाचित्रांच्या प्रदर्शनाद्वारे उचलून धरणाऱ्या विजय मुडशिंगीकर यांनी आता आपला मोर्चा छायाचित्रणाकडून माहितीपटाकडे वळविला आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसतानाही अफाट धडपड करून त्यांनी साकार केलेल्या ‘शोध तथागत बुद्धांच्या पदचिन्हांचा’ या माहितीपटाचा प्रकाशन सोहळा १९ जानेवारी रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये पार पडणार आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून त्यांच्या महानिर्वाणापर्यंतचा प्रवास या माहितीपटात चित्रित केला आहे.
विजय मुडशिंगीकर यांनी हा माहितीपट ‘प्रज्ञा क्रिएशन’च्या सहाय्याने पूर्ण केला आहे. भारत, श्रीलंका व नेपाळ या तीन देशांत चित्रित झालेला हा माहितीपट मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांत बनवला आहे.  माहितीपटाची सुरुवात भगवान बुद्धाचे जन्मस्थळ लुंबिनी (नेपाळ) येथून होते. त्यानंतर सारनाथ, राजगीर, नालंदा, श्रावस्ती, वैशाली, संकिसा, लडाख, कुशीनगर, अनुराधापूर (श्रीलंका), सांची, अजिंठा आदींचे दर्शन होते.  माहितीपटाचे प्रकाशन विश्वविख्यात न्यूरो-स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी, मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांच्या हस्ते होईल.