येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन कार्यालयासाठी वाडेघर येथे चार एकर जागा प्रस्तावित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्याची नस्ती गेल्या तीन वर्षांपासून लालफितीत अडकली आहे. जागा ताब्यात येत नसल्यामुळे या जागेवर ‘आरटीओ’ला कोणतेही बांधकाम करता येत नाही. ‘आरटीओ’ कार्यालयाकडून तगादा लावूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतेही आदेश देण्यात येत नसल्याचा गैरफायदा काही समाजकंटकांनी उठवून ‘आरटीओ’च्या प्रस्तावित जागेवर गेल्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळाचे बांधकाम सुरू केले आहे.
या सगळ्या घटनेमुळे सरकारी कार्यालयाकडून सरकारी कार्यालयाची कशी अडवणूक होते, याचा नमुना पुढे आला आहे. पालिकेने वाडेघरची राखीव जागा ‘आरटीओ’ला देण्यासाठी यापूर्वीच प्रस्ताव मंजूर केला आहे. या जागेच्या इतर हक्कांमध्ये एक पेन्सिल नोंद आहे. ती कमी करण्यासाठी कल्याणच्या तहसीलदारांनी एक प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणे आवश्यक आहे. मात्र अद्याप अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवण्यात आला नसल्याचे बोलले जाते.
आरटीओ अधिकाऱ्यांनी माजी जिल्हाधिकारी पी. वेलारासू यांना जूनमध्ये ही जागा ताब्यात घेण्यासाठी व इतर हक्कावरील नोंद कमी करण्याची मागणी केली होती. वेलारासू यांनी हा विषय नगण्य असल्याचे सांगून जमीन आरटीओच्या नावावर करण्याचे आदेश दिले होते. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कल्याण तहसीलदारांकडून अहवाल आला नाही. त्यामुळे काहीच करू शकत नाही, अशी भूमिका घेऊन ही नस्ती लालफितीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बिर्ला महाविद्यालय परिसरात असलेले सध्याचे ‘आरटीओ’ कार्यालय उपलब्ध कर्मचारी, दररोज येणारी वाहने, विविध प्रकारच्या परवाना देण्यासाठी असणाऱ्या वीस खिडक्या, नियमित वाहनांची वर्दळ यासाठी अपुरे पडते. त्यामुळे नवीन जागेच्या शोधात ‘आरटीओ’ कार्यालय होते. ‘आरटीओ’ अधिकारी वाडेघरची जागा ताब्यात देण्याचे आदेश मिळावेत म्हणून कल्याण तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटा मारत आहेत. पण त्यांना कोणीही तेथे दाद देत नसल्याचे समजते.
बांधकाम सुरू
वाडेघर येथील सव्‍‌र्हे क्र. ५५ अ येथील ‘आरटीओ’च्या प्रस्तावित जागेवर स्वामी समर्थ नावाने एक फलक लावून एका कोपऱ्याला बांधकाम सुरू असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हे बांधकाम वेगाने सुरू आहे. हे बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे. ही जागा आरटीओच्या ताब्यात देण्यासाठी महसूल विभागाकडून सहकार्य मिळावे, अशी मागणी करणारे पत्र कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेश सरक यांनी पालिका आयुक्त, तहसीलदार किरण सुरवसे यांना दिले आहे.
अहवाल पाठवला
नायब तहसीलदार कदम यांनी सांगितले, ‘आरटीओ’च्या पत्रांवरून सात बाऱ्यावरील पेन्सिल नोंद (इतर हक्कांमध्ये असलेला स्मशानभूमीचा उल्लेख) कमी करण्याचा अहवाल तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. या प्रकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात येईल. शासनाकडून प्रस्ताव आल्यानंतर वाडेघर येथील जागा आरटीओच्या नावावर होईल. त्यामुळे त्यांना बांधकाम करण्यात कोणताही अडथळा येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने हा प्रस्ताव लवकर शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.