मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल आहे. त्यामुळे राणे समितीच्या अहवालाची वाट पाहावी लागणार आहे. सरकारला कोणत्याही परिस्थितीत हक्काचे आरक्षण द्यावेच लागणार आहे. यासाठी कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. राज्य सरकारला शिवछत्रपतींच्या कार्याचा विसर पडला आहे. त्यामुळेच त्यांनी महाराजांचा इतिहास दोन पानांत गुंडाळला, असा आरोप कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला.
शिव-शाहू यात्रेनिमित्त सोमवारी परभणीत आले असता संभाजीराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या उद्धारासाठी आरक्षणाची गरज आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता हक्काचे आरक्षण मराठा समाजाला सरकारने जाहीर करावे. सध्या राणे समिती याबाबत अनुकूल आहे. त्यामुळे आपण समितीच्या अहवालाची वाट पाहात आहोत. आरक्षण जाहीर झाल्यावर त्याचे श्रेय कोणत्याही पक्षाला दिले जाणार नाही, असे ते म्हणाले.
अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंद ूमिलमधील डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे. अजिंठा लेण्यास जपान सरकार निधी देते. परंतु राज्य सरकार महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्लक्ष करते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ६ जून हा शिवराज्यभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा. या दिवशी शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी करून त्यासाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रयतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण बाहेर पडलो आहोत. बहुजनांनी एकत्र नांदावे, यासाठी आपला कायम प्रयत्न राहील. छत्रपती असल्याने कोणाच्याही पाठिंब्याची अथवा पाठिंबा देण्याची गरज नाही. तरुणांनी कष्ट करावे, केवळ महापुरुषांचा जयजयकार न करता त्यांचे विचार आत्मसात करावे, असे आवाहनही महाराजांनी केले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, उपाध्यक्ष रामेश्वर आवरगंड, प्रा. अनंतराव िशदे आदी उपस्थित होते.