हिंदी चित्रपटसृष्टीची नेमकी अशी व्याख्या नाही, गरज आहे ती त्याची कार्यशैली, मागणी व मानसिकता याच्याशी व्यवस्थित जुळवून घेऊन ‘कारागिरी’ करण्याची.. संगीतकार लक्ष्मीकांत- प्यारेलाल याबाबत सर्वोत्तम उदाहरण.
‘पारसमणी’ (१९६३) या चित्रपटापासूनच्या त्यांच्या ‘संगीत वाटचाली’चे हे पन्नासावे अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष.
या यशस्वी जोडीतील लक्ष्मीकांत यांचे २१ जून १९९८ रोजी निधन झाल्यानंतर प्यारेलाल यांनी आपला ‘संगीत प्रवास’ हळूहळू शांत केला, परंतु या जोडीचा ‘संगीत प्रभाव’ मात्र कायम आहे. प्यारेभाई अधूनमधून एखाद्या फिल्मी कार्यक्रमाला हजर असतात, पण बोलणे अगदी मोजके व कमी. मध्यंतरी एका मराठी चित्रपटाच्या ध्वनिफीत सोहळ्यातही त्यांनी भाषणबाजी व करता फक्त आशीर्वाद दिले. लक्ष्मीजींचा स्वभाव नेमका याउलट होता. पूर्वी वांद्रय़ाच्या मेहबूब स्टुडिओतील ध्वनिमुद्रण स्टुडिओत त्यांची भेट सहज होई व गाडी एकदम गप्पांवर येई. अर्थात आज गाणे ध्वनिमुद्रित करायचे आहे याचे भान येताच ते अरे वेळ काढून पारसमणीवर ये मस्त गप्पा करू, असे सांगत. जुहूला त्यांच्या पारसमणी बंगल्यावर वेळ काढून जावे लागे. कारण चित्रपट व क्रिकेट या आपल्या दोन्ही आवडत्या विषयावर इतकं मनसोक्त बोलत की, त्यांच्या त्या वृत्तीतच त्यांच्या संगीताचे सहज चालीचे मर्म व लोकभावनेची गोडी लपलेली आहे याची जाणीव होई. क्रिकेट सामन्याचे दिवस असतील तर कशावरून ते पैज लावत व त्याच आठवडय़ात एखाद्या फिल्मी पार्टीत भेटताक्षणीच पटकन म्हणत, बघ मी जिंकलो की नाही ते. माणूस एकदम हरहुन्नरी व  बेधडक.. अशा माणसाशी प्यारेजींचे सूर जुळले व त्यांनी पारंपरिक लोकप्रिय चित्रपटाच्या संगीतात ‘चौफेर भर टाकली. साठच्या दशकातील चित्रपट समीक्षकांच्या मते, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत फारसे दर्जेदार व कसदार नाही ते फक्त ‘पब्लिक प्रिय’ संगीत देतात असे होते, पण अशा टोकाच्या टीकेवर मात करीत त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले हुकमी स्थान निर्माण केले. व्यावसायिक यशाच्या समीकरणाच्या बाबतीत त्यांनी शंकर-जयकिशन यांची परंपरा व्यापक केली, असे म्हणता येईल. शंकर-जयकिशन यांनी आपल्या काळातील आघाडीच्या अनेक दिग्दर्शकांच्या चित्रपटांना संगीत देण्यात यश मिळविले. लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीने आपल्या काळातील एकमात्र नासिर हुसेन वगळता आघाडीच्या सर्व निर्माता-दिग्दर्शकांच्या चित्रपटांना संगीत देण्यात यश मिळविले. अशाने फक्त चित्रपटाची संख्या वाढते, अशी कोणी हेटाळणी करील, पण आपण अशा पद्धतीने आपली मांड मजबूत केली आहे या भावनेने आपलाच आत्मविश्वास वाढतो, कळत-नकळतपणे आपला अहंकार कुरवाळला जातो. हिंदी चित्रपटसृष्टीच्या बेभरवशाच्या क्षेत्रात व गळेकापू स्पर्धेत ‘आम्हीच श्रेष्ठ’ हे नाणे उंचावत ठेवणे गरजेचे असते.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी ‘चित्रपट संगीता’ला सुरुवात केली तेव्हा शंकर जयकिशन, नौशाद, मदन मोहन, रोशन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, सलिल चौधरी, रवी, कल्याणजी-आनंदजी यांचा विलक्षण दबदबा होता. साधा शिरकाव करणे अवघड होते, पण यांनी तर आपली जागा निर्माण केली. पहिल्याच ‘पारसमणी’ चित्रपटात हसता हुआ यह नुरानी चेहरा, वो जब याद आये अशी हिट गाणी देत त्यांनी लक्ष वेधले. अशा फॅण्टसी चित्रपटाला तेव्हा प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे संगीतकाराला नाव ते काय मिळणार? हरिश्चंद्र तारामती, संत ज्ञानेश्वर अशा चित्रपटांना संगीत देऊन फार काही साध्य होणारे नव्हते. ‘संत ज्ञानेश्वर’मधील ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ हे गाणे गाजले. पण, १९६४ साली ‘फिल्म फेअर’च्या स्पर्धेत ‘संगम’च्या शंकर-जयकिशनवर मात करून ‘दोस्ती’साठी लक्ष्मीकांत-प्यारेलालनी बाजी मारली आणि चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक व प्रसारमाध्यमे या तिन्ही घटकांचे या जोडीकडे लक्ष गेले व ते बराच काळ राहिले. ‘दोस्ती’तील ‘मेरा ज्यो भी कदम है’, ‘राही मनवा दुख की चिंता’, ‘तेरी दोस्ती मेरा प्यार’ अशी सगळीच गाणी हिट ठरली. सिनेमाच्या जगात यशासारखे सुख नाही, पारितोषिकासारखे टॉनिक नाही व वाढत्या मागणीसारखा आनंद नाही. लक्ष्मी-प्यारे यांचा चौफेर संचार सुरू झाला, त्याचे साम्राज्यात कधी रूपांतर झाले हेदेखील समजले नाही. प्यार बाटते चलो (हम सब उस्ताद है), अजनबी तुम जाने पहचाने (मिस्टर एक्स इन बॉम्बे) यह दर्द, भरा अफसाना (श्रीमान, फंटुश), कैसे रहू चूप की मैने (इंतकाम), दिल खिल प्यार ब्यार (शागीर्द) असे करीत करीत मिलन (सावन का महिना, हम तुम युग युग से), दो रास्ते (यह रेश्मी जुल्फे, बिंदिया चमकेगी, मेरे नसीब में, छुप गये सारे नजारे) अशा चित्रपटांच्या वेळी त्यांनी खूपच मोठी मजल मारली. त्या काळातील त्यांच्या चित्रपटात आये दिन बहार के, कर्ज, पत्थर के सनम, तकदीर, इज्जत, मेरे हमदम, मेरे दोस्त, राजा और रंक, अंजाना, आया सावन झुमके खूप महत्त्वाचे. त्या काळातील चित्रपट रसिकांना एव्हाना काही गाणी आठवली असतील, भारतीय संगीत व विदेशी संगीत यांची युती करताना त्यांनी बऱ्याचदा लोकसंगीतावर भर दिला, तर अनेकदा चित्रपटाचे स्वरूप अर्थात मागणी पाहून ‘चाली’ बांधल्या. ते गरजेतून आले, पण राज कपूरच्या ‘बॉबी’च्या वेळी ते ‘लोकप्रिय’ ठरले (हम तुम एक कमरे में बंद हो, झूठ बोले कौव्वा कांटे इत्यादी) तर अली राझाच्या ‘दस नंबरी’च्या वेळी वादग्रस्त ठरले (प्रेम का रोग बरा बुरा गाण्यावर प्रचंड टीका झाली.) लक्ष्मीकांत-प्यारेलालजींनी व्यावसायिकता सांभाळत मार्गक्रमण केले (म्हणजे ते तेव्हाच काळाच्या पुढे होते.) राज कपूर (सत्यम शिवम सुंदरम), मनोजकुमार (रोटी, कपडा और मकान), राज खोसला (प्रेम कहानी), मोहनकुमार, (अमीर गरीब), चेतन आनंद (जानेमन), विजय आनंद (रजपूत), मोहन सैगल (कर्तव्य), मनमोहन देसाई (रोटी), राजकुमार कोहली (जानी दुश्मन), जे. ओम प्रकाश (आशा), सुभाष घई (कर्ज), के. बालचंदर (एक दुजे के लिए), बी. आर. चोप्रा (दास्तान), रवी टंडन (अनहोनी), दुलाल गुहा (धरती कहे पुकार के), रामानंद सागर (प्रेम बंधन), प्रमोद चक्रवर्ती (ड्रीम गर्ल), शक्ती सामंता (अनुरोध) अशा कितीतरी आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांना त्यांनी संगीत देत आपले आसन बळकट केले, यातील काही दिग्दर्शक अन्य संगीतकारांकडून लक्ष्मी-प्यारेकडे आले, तर कंसात उल्लेखलेल्या चित्रपटांसह काही दिग्दर्शकांच्या अन्य चित्रपटांनादेखील त्यांचेच संगीत होते. सुभाष घईच्या ‘वैभवा’त लक्ष्मी-प्यारेचा वाटा खूप मोठा.
एवढय़ा मोठय़ा कारकिर्दीत काही वाद होणारच, प्रेम प्रकाश दिग्दर्शित ‘चोर चोर’ चित्रपटनिर्मितीच्या काळात वादकांचा संप झाल्याने विजय आनंद (यात हीरो होता) थांबायला तयार नव्हता, म्हणून लीना चंदावरकरसोबतच्या प्रणयप्रसंगी गाणे नव्हते. तरी चित्रपटाच्या संगीताचे श्रेय लक्ष्मी-प्यारेला मिळाले, अर्थात ते पाश्र्वसंगीताचे होते. तर ‘कुली’च्या मनमोहन देसाईंना घाई होती म्हणून त्यांनी लक्ष्मी-प्यारेंची व्यस्तता पाहून अन्नू मलिककडून पाश्र्वसंगीत करून घेतले म्हणून वाद झाला. लक्ष्मीकांतजींना ती आपल्या कामात ढवळाढवळ वाटली. संगीत चालीसाठी लक्ष्मी-प्यारेंनी राज कपूरच्या आर. के. कॉटेजमध्ये जायचे की राज कपूरने लक्ष्मी-प्यारेच्या सीटिंग रूमवर जायचे, या वादातून ‘राम तेरी गंगा मैली’ रवींद्र जैनकडे गेला. ‘टिंकू’ चित्रपटाच्या वेळी राजेश खन्नाशीही वाद रंगला. या प्रत्येक वादाची तात्कालिक काळात उलटसुलट चर्चा झाली.
लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर हे मूळचे आमच्या गिरगावचे! ते मॅन्डोलिन वादनात ख्यातनाम. चित्रपट मिळविणे ही त्यांची जबाबदारी. प्यारेलाल रामप्रसाद शर्मा ट्रम्पपेंटर म्हणून ख्यातनाम. आपल्या वडिलांकडून त्यांच्याकडे संगीत वारसा आला. बांधणीत चाल व वाद्यवृंद यांचा मेळ घालणे गरजेचे असते, दोघेही दोन्हींत मातब्बर. बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की,  ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने,  ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.
तब्बल अडीचशे चित्रपटांना संगीत ही वाटचाल भरपूर मोठी. काळ खूप पुढे सरकला, कित्येक नवीन संगीतकार आले व संगीत प्रसारणाच्या बऱ्याच नवीन वाटा आल्या (रिंगटोन, कॉलरटय़ून इत्यादी), पण लक्ष्मी-प्यारेंचे संगीत कालबाह्य़ झाले नाही. जोडीतील एकाचे निधन झाले व दुसऱ्याने बाजूला होणे पसंत केले तरी गाण्याची वाटचाल व लोकप्रियता थांबली नाही. म्हणूनच तर त्यांच्या ५० वर्षांच्या प्रवासाची ही दखल घ्यायला हवी.