महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त शहरातील पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळय़ास हजारो आंबेडकरी जनसमुदायाने मेणबत्ती प्रज्वलित करून आदरांजली वाहिली. पार्क चौक परिसरात दिवसभर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. डॉ. आंबेडकर पुतळय़ावर दुपारी एका छोटेखानी विमानातून पुष्पवृष्टीही करण्यात आली. समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. आंबेडकरांच्या पुतळय़ाला मानवंदना देण्यात आली. तेथे एका स्वतंत्र व्यासपीठावर भीमशाहिरांकडून दिवसभर भीमगीते सादर केली जात होती.
आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह महापौर अलका राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. निशिगंधा माळी, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, उपमहापौर हारून सय्यद, जि. प. समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे आदींनी डॉ. आंबेडकर पुतळय़ास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या वतीनेही डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. पार्क चौकात दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कलाकार मंचच्या माध्यमातून भीमशाहिरी तथा जलसा असे कार्यक्रम सुरू होते.
माजी उपमहापौर अप्पाशा म्हेत्रे व महेश निकंबे मित्रपरिवाराच्या पुढाकाराने पार्क चौक व न्यू बुधवार पेठेतील डॉ. आंबेडकरांच्या दोन्ही पुतळय़ांवर तसेच बुधवार पेठ-मिलिंदनगरातील डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिविहारावर विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी आंबेडकरी चळवळीतील राजा इंगळे, राजा सरवदे, के. डी. कांबळे, सुभानजी बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील प्रबुद्ध भारत मंडळाच्या वतीने पार्क चौकात डॉ. आंबेडकर पुतळय़ाचा परिसर एक हजार किलो फुलांनी सुशोभित करण्यात आला होता.
पार्क चौकाप्रमाणेच बुधवार पेठेतील मिलिंदनगरातील डॉ. बाबासाहेबांच्या अस्थी मंदिरातही दर्शनासाठी गर्दी झाली होती. त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने सामुदायिक बुद्धवंदना करण्यात आली. तसेच न्यू बुधवार पेठेत रमाबाई आंबेडकरनगरातील डॉ. आंबेडकर पुतळय़ासही अभिवादन करण्यात आले.