भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘हुंकार’ सभेच्यापूर्वी पाटणा (बिहार) येथे झालेल्या सात साखळी बॉम्बस्फोटाविरोधात येथे भाजपाच्यावतीने सोमवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अ‍ॅड.संपतराव पवार, किशोर घाटगे, नगरसेवक सुभाष रामुगडे, नगरसेविका प्रभा टिपुगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी बॉम्बस्फोटात बळी पडलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, मोदींच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांना पोटशूळ उठला आहे. बॉम्बस्फोट होऊन सुध्दा सहा लाख नागरिकांपैकी एकही नागरिक जागेवरून हालला नाही यावरून लोकांचा मोदींवरील विश्वास दिसून येतो. केंद्र सरकारने या स्फोटाचा मास्टर माईंडचा शोध घ्यावा. हा स्फोट इंडियन मुजाहिद्दीनने केला आहे असा संशय व्यक्त होत आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या मोदींच्या सभेस यापेक्षा जास्त जनतेकडून प्रतिसाद मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी ‘नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘केंद्र सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी शिवाजी चौकाचा परिसर दणाणून सोडला.
डॉ.बी.एस.शेलार, सुरेश जरग, विजय जाधव, हेमंत आराध्ये, संदीप देसाई, तेजस्विनी हराळे, अशोक लोहार, नाना जरग, प्रशांत जरग, नचिकेत भुर्के, संतोष कारंडे, श्रीकांत घुंटे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.