कोल्हापूर शिवसेनेत काल हातघाई झाल्यानंतर आज बुधवारी शाब्दिक वाद सुरूच राहिला. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गटबाजीला खतपाणी घालणारे संपर्क प्रमुख दिवाकर रावते, संपर्क नेते अरूण दुधवाडकर यांची बदली करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर हल्ला चढवितांना त्यांनी पदाचा वापर करून प्रचंड माया जमविली असल्याने त्यांची लोकप्रतिनिधी होण्यापूर्वीची व आत्ताची मालमत्ता शासकीय यंत्रणेमार्फत तपासण्यात यावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपला पुढील निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी काल एका बैठकीच्यावेळी उघडकीस आली होती. संपर्कप्रमुख आमदार रावते व संपर्क नेते दुधवाडकर यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख पवार गटाकडून धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. शिवसेनेत झालेल्या या राडय़ाची दिवसभर चर्चा सुरू होती. या वादावर पडदा पडेल असे वाटत असतांना आज संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा नेतृत्वावर तोफ डागली.    दिलबहार तालीम येथे झालेल्या पत्रकार बैठकीत संजय पवार, तानाजी आंग्रे, कमलाकर जगदाळे,रवी चौगुले, विजय कुलकर्णी, सुजित चव्हाण, नगरसेवक राजू हुंबे, अरूणा टिपुगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. संजय पवार म्हणाले,‘‘ रावते व दुधवाडकर ही जोडगोळी नेहमीच गटबाजीला खतपाणी घालत आलेली आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून अजिबात मान दिला जात नाही. त्यांचे नेतृत्व मान्य नसल्याने त्यांना पदावरून हटवावे, अशी जिल्हयातील शिवसैनिकांची मागणी आहे.’’
आमदार क्षीरसागर यांना टीकेचे लक्ष्य करतांना पवार म्हणाले,‘‘ एका व्यक्तीकडे एक पद अपेक्षित असतांना क्षीरसागर यांच्याकडे आमदार व शहरप्रमुख अशी दोंन्ही पदे आहेत. त्यांना शहरप्रमुख पदावरून तत्काळ हटविण्यात येऊन त्या जागी कार्यक्षम कार्यकर्त्यांची निवड केली जावी. आमदार झाल्यापासून क्षीरसागर यांचे आर्थिक व्यवहार संशयास्पद आहेत. त्यांच्याबरोबरच आमच्याही मालमत्तेची चौकशी होण्याची गरज आहे.’’    
माजी शहरप्रमुख दिलीप पाटील-कावणेकर यांच्या बुलंद दरवाजा शाखेतून आर्थिक गैरव्यवहार केला जातो. तेथे ‘आंबे पाडण्याचे’ काम होते असा आरोप क्षीरसागर गटाकडून होत आहे. जे आर्थिक गैरव्यवहार करतात त्यांच्याकडून अशाप्रकारचे आरोप होणे पूर्णत गैर आहे. जे आंबे पाडतात त्यांनाच असले उद्योग सुचतात, अशी टीकाही पवार यांनी केली.     
कालच्या बैठकीवेळी जो गोंधळ झाला आणि एकूण जिल्ह्य़ातील शिवसेनेमध्ये जी परिस्थिती उद्भवलीआहे, त्याची माहिती कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन देणार आहे. दोन दिवसात ठाकरे यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. या बैठकीनंतर आपण पुढील निर्णय घेणार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.