महाराष्ट्राच्या मातीत व मराठी माणसात काहीही कमी नाही. परंतु त्यांच्यात फक्त इच्छाशक्ती नाही. इच्छाशक्ती असेल तर ‘लवासा’ प्रकल्प होतो तर सोलापूरसह महाराष्ट्राचा विकास का होत नाही? तिकडे लवासा प्रकल्पासाठी जीव ओतून काम करता, पण इकडे महाराष्ट्रासाठी का नाही, असा सवाल उपस्थित करीत, आम्हीच या महाराष्ट्राचे मालक व राजे असल्याचा माज त्यांना आला आहे. जनतेने हा माज उतरवून राज्यात बदल घडविण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार प्रहार केले.
पक्षसंघटना बांधणीसाठी शुक्रवारी सायंकाळी येथील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्या वेळी त्यांनी ठाकरी शैलीत भाषण करीत तरुण पिढीची मने काबीज केली. या सभेसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. गर्दीच्या तुलनेत सभेचे मैदान अपेक्षेप्रमाणे अक्षरश: तोकडे पडले. मैदानावर जेवढी गर्दी होती, त्यापेक्षा जास्त गर्दी मैदानाबाहेरील रस्त्यांवर झाली होती. रस्त्याच्या पलीकडील महापालिकेचा इंद्रभवन परिसरही गर्दीने फुलून गेला होता. तरीही जागा मिळेना म्हणून की काय, ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी तरुणांना मैदानाच्या कडेला असलेल्या झाडांवर चढावे लागले. मोठी जोखीम पत्करून रस्त्यावरील ८० फूट उंच दिशादर्शक फलकावरही तरुणवर्गाने चढाई केली होती. या उपरदेखील तरुणांचे जत्थे उत्तरोत्तर वाढतच होते. सायंकाळी पाचपासूनच सभेच्या ठिकाणी तरुणांचे जत्थेच्या जत्थे येत होते. मनसे कार्यकर्ते गळय़ात पक्षाच्या कापडी पट्टय़ा घालून राज ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत, वाजतगाजत येत होते. जसजशी गर्दी वाढू लागली, तस तसा त्या ठिकाणचा उत्साह वाढत गेला.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्रात शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखी मातब्बर नेतेमंडळी असूनदेखील महाराष्ट्रावर केंद्राकडून कसा अन्याय होतो, याची काही उदाहरणे दिली. मुंबईतील एअर इंडिया कंपनीचे कार्यालय केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री अजितसिंह यांनी नवी दिल्लीत पळविण्याचा घाट घातल्याचा आरोप त्यांनी केला. एअर इंडिया कार्यालयात मुंबईतील मराठी तरुण नोकरी करतात. जे महाराष्ट्राचे आहे ते व मराठी तरुणांना नोकऱ्या मिळतात, ते सर्व नवी दिल्लीत पळवून नेण्याचा अजितसिंहांचा विचार हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. महाराष्ट्रावरील अन्याय सहन केला जाणार नाही. महाराष्ट्र स्वाभिमानाने व सन्मानाने उभा राहावा म्हणून  प्रखर लढा देत राहू. त्यासाठी कितीही वेळी अटक झाली तरी त्यास आपण भीक घालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दुष्काळाच्या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, दुष्काळावर मात करून पीडित जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी सत्ताधारी पाळत नाहीत. दुष्काळग्रस्त भागाचे दौरे काढले की त्यांचे काम संपले. एवढीच त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील पीडितांचे तांडय़ांचे तांडे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यांसारख्या महानगरात येतात. अगोदरच या महानगरांमध्ये परप्रांतीयांचे लोंढे येतात. त्यात दुष्काळग्रस्त भागातील कुटुंबीयांचे स्थलांतर वाढत चालल्यामुळे महानगरातील पायाभूत सुविधांचे नियोजन कोलमडत चालले आहे. दुष्काळी भागातील पीडित कुटुंबीयांचे तांडे आपलेच आहेत. परंतु परप्रांतीयांचे लोंढे वाढत आहेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना काहीही देणेघेणे नसल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. आपण मते मागायला आलो नाही, तर मत मांडायला आणि मत बनवायला आलो आहोत, असे स्पष्ट करीत आगामी निवडणुकांपर्यंत आपले मत मनात साठवून ठेवा आणि बदल घडवा, अशी हाक द्यायला ठाकरे विसरले नाहीत.
सोलापूरचा नावलौकिक एकेकाळी वस्त्रोद्योगनगरी म्हणून केला जायचा, परंतु आता ही नगरी बरबाद झाली आहे. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात गृहमंत्री असताना केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे सोलापूरची ही दशा झाल्याचा आरोप करताना ठाकरे यांनी अलीकडे वस्त्रोद्योग क्षेत्रात त्रिपुरा आणि लुधियानाचा विकास झाला. कारण तेथील नेतृत्वाने हजारो कोटींचा निधी आणला. त्याप्रमाणे सोलापूरसाठी सुशीलकुमारांनी निधी का आणला नाही, का बरे सोलापुरात वस्त्रोद्योग उभे केले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी मतदार जनतेला ‘मेंढरे’ म्हणून गृहीत धरले आहे. त्यांचा हा समज जनतेने दूर करावा, असे आवाहन त्यांनी केले.