मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने हिवाळी हंगामात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या सोलापूर-पुणे सुपरफास्ट या साप्ताहिक एक्स्प्रेसला सलग चौथ्यांदा मुदतवाढ मिळण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहे. या गाडीला प्रवाशांची दिलेला प्रतिसाद लक्षात घेता ही गाडी कायमस्वरूपी धावण्यासाठीही रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या नोव्हेंबरमध्ये दर रविवारी ही हिवाळी सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू झाली होती. दर रविवारी सकाळी ११.१० वाजता ही गाडी सोलापूरहून सुटते. कुर्डूवाडी, दौंडमार्गे ही गाडी पुण्याला दुपारी ३.२० वाजता पोहोचते. तर परतीच्या प्रवासासाठी पुण्यातून दुपारी ३.५० वाजता सुटून ही गाडी रात्री ८.५० वाजता सोलापुरात पोहोचते. या गाडीला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या गाडीला तीनवेळा मुदतवाढ मिळाली. त्यानंतर आता पुन्हा चौथ्यांदा मुदतवाढ मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट साप्ताहिक गाडी कायमस्वरूपी धावण्यासाठी प्रयत्न सुरू असून, केवळ साप्ताहिक नसून तर दररोज धावावी म्हणून सोलापूर विभागाचे प्रशासनाकडून पाठपुरावा चालू असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.