शहरातील रंगकर्मी व नाटय़प्रेमींना महानगरपालिकेने सुखद धक्का दिला आहे. सावेडीतील नियोजित अद्ययावत नाटय़गृहाला अद्याप मुहूर्त लागलेला नाही, मात्र वैभवशाली परंपरा असलेल्या रंगभवन खुल्या नाटय़गृहाचे नष्टचर्य आता संपणार आहे. अ‍ॅम्फी थिएटरच्या धर्तीवर या नाटय़गृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, पुरेशा आर्थिक निधीसह येत्या शुक्रवारी (दि. ५) या कामाचा शुभारंभ होणार आहे.
सर्जेपुऱ्यातील रंगभवन खुले नाटय़गृह बंद पडले, त्यालाही आता किमान २५-३० वर्षे होऊन गेली. त्याआधी उणीपुरी पन्नास वर्षे रंगभवननेच नगरकरांची सांस्कृतिक विशेषत: नाटकाची भूक भागवली. मराठी रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांसह सारस्वतातील अनेक मान्यवरांनी वेळोवेळी येथे हजेरी लावली आहे. मात्र बंद पडल्यापासूनच कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या या नाटय़गृहाचे आता नूतनीकरण करण्यात येत आहे. रंगभूमिदिनी दि. २७ मार्चला महापौर शीला शिंदे व मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांनी शहरातील रंगकर्मीना याबाबतचे आश्वासन दिले होते, ते आता पूर्णत्वास जात आहेत. मनपाचे शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
सावेडीतील नियोजित नाटय़गृहासाठी रंगकर्मी गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत, मात्र या काळात कुठल्याच सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडवता आला नाही. ते होईल तेव्हा होईल, तूर्त रंगभवन वापरायोग्य करून त्याचे चांगले नूतनीकरण करण्याची अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची मागणी होती. संघटनेने त्यासाठी अनेकदा आंदोलनेही केली. एन. डी. कुलकर्णी यांनी सांगितले, की मनपाच्या विकास भार निधीतून ३० लाख रुपयांचा निधी रंगभवनसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अ‍ॅम्फी थिएटरच्या धर्तीवर रंगभवनचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
मुख्यत्वे नाटकासाठी आवश्यक असणारा पुरेशा लांबी-रुंदीचा रंगमंच, त्यापुढय़ात प्रकाश व ध्वनियोजनेसाठी प्रशस्त हौदा, रंगमंचाला खेटून रंगपटाच्या खोल्या, ५०० प्रेक्षक बसू शकतील अशी पायऱ्यांची प्रेक्षक गॅलरी, पुढच्या बाजूला तीन व मागे एक प्रवेशद्वार आणि चारही बाजूने १४ फूट उंचीची मोठी कुंपणाची भिंत अशी रचना करण्यात आली आहे. या भिंतीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही. पुढच्या तीनपैकी एका प्रवेशद्वाराशीच बुकिंग खिडकीची खोलीही बांधण्यात येणार आहे. निधीची तरतूद झाल्यामुळे यात अडचणी येणार नाहीत, सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील असे कुलकर्णी यांनी सांगितले.