रेणुका शुगर्स कंपनीने गतवर्षी अन्य साखर कारखान्यापेक्षा १०० रुपये जादा दर देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे गतवर्षीचे १५० रुपये मिळाल्याशिवाय पंचगंगा साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी रेणुका शुगर्स संचलित पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाला दिला. गतवर्षीचे १५० रुपये मिळावे म्हणून संघटना पदाधिकारी आणि पंचगंगा कारखान्याच्या संचालकांच्यात सुमारे दोन तास चालेल्या बठकीत समाधानकारक निर्णय न झाल्याने संघटनेने हा इशारा दिला.
रेणुका शुगर्स कंपनीने पंचगंगा सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतला आहे. त्यावेळपासून सभासदांना साखर मिळत नाही तसेच गतवर्षी जाहीर केलेला दरही अद्याप मिळाला नाही. सभासदांना सवलतीच्या दरात साखर मिळावी आणि गतवर्षी जाहीर केल्याप्रमाणे अन्य कारखान्यापेक्षा जादा १०० रुपये मिळावेत म्हणून वारंवार आंदोलन करूनही रेणुका शुगर्स व्यवस्थापन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि पंचगंगा साखर कारखाच्याचे संचालक यांची संयुक्त बठक आयोजित करण्यात आली होती. बठकीत पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी.एम. पाटील यांनी रेणुका व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत वारंवार जाणीव करून देऊन चर्चा केली. मात्र व्यवस्थापन त्याकडं दुर्लक्ष करत आहे.

त्यामुळे सभासदांच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून वकिलांचा सल्ला घेऊन रेणुका व्यवस्थापनाला नोटीसा बजावल्याचे सांगितले. स्वाभिमानी संघटनेचे जयकुमार कोले, सावकार मादनाईक, आण्णासाहेब चौगुले यांनी रेणुका गतवर्षी जाहीर केलेला दर दिल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही. तसेच पंचगंगा कारखाना भाडय़ाने घेऊन मालकी हक्क गाजवत मनमानी कारभार होत असेल तर शेतकरी ते सहन करणार नाहीत, असा इशारा दिला.     
सुमारे दोन तास चाललेल्या या बठकीत संघटनेनं प्रसंगी कारखाना बंद राहिला तर चालेल पण सभासदांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळं पंचगंगा कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. यावेळी कारखान्याचे संचालक कुमार खुळ, बंडा माने, नीलेश खोत, कार्यकारी संचालक नंदकुमार साठे, स्वाभिमानीचे नागेश पुजारी, शीतल कंटी, विजय भोसले, के.आर. चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकत्रे उपस्थित होते.