पाणीटंचाईची तीव्रता जसजशी वाढू लागली आहे, तसतसे बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे अर्जही वाढू लागले आहेत. विशेषत: जालना, उस्मानाबाद व औरंगाबादमधील जिल्हाधिकारी, तसेच विभागीय आयुक्तांना बंधाऱ्यांच्या दरवाजांबाबत निवेदने मोठय़ा प्रमाणात दिली जात आहेत.
बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील गावकऱ्यांनी १५ वर्षांपूर्वी बांधलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा सिमेंट बंधाऱ्यात रूपांतरित करावा, अशी मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून या बंधाऱ्याला लोखंडी दरवाजे नाहीत. दोन्ही बाजूंना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते.  गावकऱ्यांनी बंधाऱ्याविषयी छायाचित्रासह सर्व माहिती कळविली. पाण्याचे संकट दूर व्हावे म्हणून वारंवार निवेदने दिली जात आहेत. गेल्या काही दिवसांत यात वाढ झाल्याचे अधिकारी सांगतात.