उरण ते करंजा या ३.७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यातील खड्डय़ांमुळे अनेकांना पाठीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता करंजा, चाणजे परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करीत आंदोलनही केलेले होते. त्यामुळे सिडकोने या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्याकडे पाठविला असून लवकरच या कामाला मंजुरी मिळेल, अशी माहिती सिडकोच्या द्रोणागिरी विभागाचे अधीक्षक अभियंता संजय चौटीलिया यांनी दिली आहे.
चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील उरण ते करंजा हा रस्ता उरण – अलिबाग या जिल्ह्य़ाच्या मुख्यालयाला जोडणाऱ्या मार्गातील महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यातून करंजा या महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा बंदरातील मालाच्या ने-आण करण्यासाठीही वापर केला जात आहे.  या रस्त्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रधानमंत्री सडक योजनेतून दुरुस्तीचे काम करण्यात आलेले होते. या कामाची पाच वर्षांची हमी देण्यात आलेली होती.
मात्र रस्ता पहिल्या पावसातच वाहून गेला.  रस्त्यातील खड्डय़ांमुळे झालेल्या अपघांतामुळे अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्वही आल्याने त्यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. अशा स्थितीत रस्त्याची दुरुस्ती आणि तीही टिकाऊ स्वरूपाची होण्यासाठी रस्त्याच्या दुरुस्ती बरोबरच रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी गटारही उभारण्यात येणार आहेत. आचारसंहिता संपताच काम सुरू होण्याची शक्यता असल्याने करंजा ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.