विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेच्या ९ जागासांठी २० मार्चला होणाऱ्या निवडणुकीत विदर्भाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांनी आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे.
विधान परिषदेच्या ७८ सदस्यांपकी १२ सदस्य राज्यपालाव्दारे नामनिर्देशित असतात, तर ३१ सदस्य विधानसभेच्या सभासदांव्दारे आणि २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांव्दारे निवडले जातात. ७ सदस्य शिक्षक मतदारसंघातून आणि तितकेच पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. प्रत्येक प्रवर्गातून दर दोन वर्षांंनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होऊन इतकेच सभासद पुन्हा निवडले जातात. त्यामुळे प्रत्येक सदस्याला ६ वर्षांचा कार्यकाळ मिळतो. विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या सभासदांपकी ९ सभासद निवृत्त होत असल्यामुळे २० मार्चला ही निवडणूक होणार आहे. यात विदर्भाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आहे.
विधान परिषदेचे माजी सदस्य आणि वीज मंडळाचे माजी सदस्य पुसदचे विजय पाटील चोंढीकर यांना उमदेवारी मिळावी म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी नेत्यांचे एक शिष्टमंडळ नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटल्याचे वृत्त आहे. कांॅग्रेसतर्फे खासदारकीसाठी हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांची विधान परिषदेत वर्णी लागावी, यासाठी त्यांच्या चाहत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विधान परिषदेवर निवडून गेलेले आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे. विदर्भातून विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघातून वसंतराव खोटरे (अमरावती विभाग) आणि ना.गो. गाणार (नागपूर विभाग), तर पदवीधर मतदारसंघातून भाजपचे डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग) आणि भाजपचेच माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी (नागपूर विभाग) निवडून  आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राकॉंचे संदीप बाजोरिया (यवतमाळ), गोपीकिसन बाजोरिया, (अकोला-वाशीम-बुलढाणा), भाजपचे मितेश भांगडीया (वर्धा-चांदा- गडचिरोली) आणि राजेंद्र मुळक (नागपूर) निवडून आले आहेत. राज्यपालाकडून नामनिर्देशित १२ सदस्यांमध्ये एकही सदस्य विदर्भातील नाही. उल्लेखनीय म्हणजे, साहित्य, कला, विज्ञान. क्रीडा किंवा समाजसेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींमधून ही निवड व्हावी, अशी संविधानाची भावना असली तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांच्या नेत्यांची वर्णी लागते, असा अनुभव आहे.
श्रद्धा आणि सबुरी
विधान परिषदेसाठी उमेदवारी देतांना अनेक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा विचार पक्षांना करावा लागतो. जात हा घटक कागदोपत्री दुर्लक्षित असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीत व्यवहारात जात नाकारता येत नाही. अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, महिला, तसेच राजकारणात उपद्रवमूल्य असलेल्यांचाही विचार उमदेवारी देतांना करावा लागतो. त्यामुळे पक्षांवर श्रद्धा ठेवून सबुरी बाळगा, असा सल्ला दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांंना दिल्याचे वृत्त आहे.