भक्ष्याचा पाठलाग करताना खोल विहिरीत पडलेला बिबटय़ा शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचला. वन विभागाच्या कर्मचा-यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने बारा तासांहून अधिक वेळ बिबटय़ाला विहिरीत टायरवर बसून काढावे लागले.
शहरालगतच्या कासारवाडीत राहणारे राजू जोर्वेकर यांच्या विहिरीत आज पहाटेच्या सुमारास बिबटय़ा पडला. विहीर खोल व त्यात पाणीही खूप होते. कडय़ाकपाऱ्या नसल्याने बिबटय़ाला कशाचाही आधार मिळेनासा झाला. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्याचे निकराचे प्रयत्न चालू होते. जोर्वेकर नेहमीप्रमाणे सकाळी विहिरीवर गेले आणि विहिरीतील बिबटय़ा पाहून तेही गोंधळून गेले. मात्र जीव वाचविण्याची त्याची तगमग पाहून त्यांना दया आली. त्यांनी आजूबाजूच्या शेतक-यांना बोलावले व वन विभागालाही सूचना दिली. मात्र वन विभागाच्या कर्मचा-यांची वाट पाहात बसलो तर बिबटय़ाचे प्राण जातील हे लक्षात आल्याने जोर्वेकर यांनी एका टायरला दोर बांधून तो विहिरीत सोडला. प्रचंड दमछाक झालेला बिबटय़ा अलगद त्या टायरवर जाऊन पहुडला.
बिबटय़ाची माहिती मिळताच अनेक बघ्यांनीही तेथे गर्दी केली. दुपार टळून गेली तरी वन विभागाचे कर्मचारी येईनात म्हणून आता करायचे काय असा प्रश्न जोर्वेकर व तेथील शेतक-यांना पडला अखेर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कर्मचारी तेथे दाखल झाले व बिबटय़ाची सुटका करण्यात आली.