अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. १७ वर्षीय मुलीने या टोळीच्या तावडीतून सुटका करून वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या माहितीवरून तीन मुलींची सुटका करण्यात आली. शिवम बनवारीलाल कुमावत, सीता कुमावत, अर्चना कुमावत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून अजून दोन आरोपी फरार आहेत.
मध्य प्रदेशातील ही अल्पवयीन मुलगी १२ वी मध्ये शिकत होती. चार महिन्यांपूर्वी ती आपली मैत्रिणीसह फिरायला बाहेर पडली असता मैत्रिणीचा मित्र आरोपी शिवम कुमावत याने पीडित मुलीला फसवून आपल्या घरी नेले आणि आई व बहिणीच्या मदतीने तिला तेथे डांबून ठेवले होते. तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. त्यांनतर पीडित मुलीला वाशी येथील जुईगावामध्ये एका घरात डांबून ठेवले. त्याच घरामध्ये इतर तीन मुलींनादेखील ठेवण्यात आले होते. त्याच्याकडून ही टोळी वेश्याव्यवसाय करून घेत होती. शिवम कुमावत याने पीडित मुलीला साडेचार लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्नदेखील केला. मात्र ती अल्पवयीन असल्याचे समजल्यांनतर या ग्राहकाने तिचा विचार सोडून दिला होता. या मुलीने टोळीच्या तावडीतून सुटका करून घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. पण तिला यामध्ये यश आले नाही. अखेर सोमवारी संधी साधून पीडित मुलीने तेथून पळ काढत एका रिक्षाचालकाकडे मदतीची याचना केली. या रिक्षाचालकाने कोपरखरणेतील अखिल भारतीय अग्निशिक्षा मंच या स्वयंसेवी संघटनेच्या अलका पांडे यांच्याकडे सोडले. त्यांच्या मदतीने या मुलीने ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देत वाशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यांनतर वाशी पोलिसांनी वाशी जुहूगावात छापा मारून आरोपींना अटक केली.