संशोधन असो की परिवर्तन, ही कामे विवेकाने, शांततेने, चिकाटीने व संयमाने होत असतात, असे प्रतिपादन डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
डॉ. श्रीराम गुंदेकर यांच्या ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास खंड २’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात डॉ. साळुंखे बोलत होते. संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव अध्यक्षस्थानी होते. डॉ. गोपाळराव पाटील, प्राचार्य डॉ. आर. एल. कावळे, प्राचार्य एस. बी. जाधव, मुर्गाप्पा खुमसे आदी उपस्थित होते. डॉ. साळुंखे म्हणाले, की डोंगराएवढी कामे एकदाच व एकदम करू म्हटले तर होत नसतात. टप्प्याटप्प्याने, सावकाश पद्धतीने अशी कामे करावी लागतात. समाजोपयोगी संशोधन याच पद्धतीने करावे लागते. त्यामुळे समाजाला मोठे वैचारिक धन उपलब्ध होते. राजर्षी शाहूमहाराज, डॉ. पंजाबराव देशमुख, माधवराव बागल, पंढरीनाथ पाटील, वानखेडे ही डोंगराएवढी सत्यशोधक माणसे होती. त्यांच्यासारख्या लेखकांची माहिती सत्यशोधकी साहित्याचा इतिहास लिहिल्यामुळे उपलब्ध झाली आहे.
कॉ. ढमाले यांनीही विचार मांडले. मराठी वाङ्मय इतिहासातील अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली. प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर चालणारी असते. सत्यशोधकी साहित्याने कष्टकरी समाजाला केंद्रिबदू मानले. त्यांना साहित्याचे नायक बनवले, असे ते म्हणाले. प्राचार्य जाधव यांनी अंतिम सत्य कधीच कोणाला सापडलेले नसते. वैज्ञानिक नेहमी सत्याच्या शोधात असतात. आपले सर्वच धर्म अंतिम सत्य सापडल्याचा दावा करतात. सत्यशोधकी साहित्य विज्ञानवादी व विवेकनिष्ठ आहे, असे सांगितले. प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर यांनी प्रास्ताविक, तर प्रा. हंसराज भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जयद्रथ जाधव यांनी आभार मानले.