देशी जनावरांनाच अधिक सशक्त करण्याचे विद्यमान सरकारचे उद्दिष्ट असून जास्त दूध देणाऱ्या संकरित जातींची पैदास करण्यासाठी विदेशातील पशूंची मदत घेण्यापेक्षा देशातील जातिवंत जनावरांचे स्थानिक जनावरांशी संकर घडवून उच्च प्रतीच्या संकरित पशूंच्या निर्मितीवर संशोधन सुरू असल्याची माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) पशू विज्ञानचे उपमहासंचालक डॉ. के.एम.एल. पाठक यांनी दिली. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आविष्कार’ या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात विशेष पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
भारतातील विविध राज्यांमध्ये जातिवंत देशी जनावरे आहेत. त्यांचे आणि कनिष्ठ दर्जाच्या जनावरांचे संकरित वाण तयार करण्यासाठी भाजप शासनाने ‘गोकुळ मिशन’ची स्थापना केली आहे. केंद्र शासनाने पंचवार्षिक योजनेंतर्गत या गोकुळ मिशनसाठी ५०० कोटींची तरतूद केली असून यावर्षी १५० कोटी रुपये जनावरांचे संकरित वाण तयार करण्यासाठी मिळाले आहेत. ‘ग्लोबल वार्मिंग’ हा विषय सर्वाच्याच परिचयाचा असून त्याचा मनुष्य, निसर्गावरील परिणाम आपण अनुभवत आहोत. त्याचा परिणाम जनावरांवरही होत असतो. हवामानातील बदलामुळे त्यांना ‘तोंडखुरी’ आणि ‘पायखुरी’ सारखे आजार होतात. त्यामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात. हे आजार बरे करण्यासाठी शासनाला दरवर्षी २० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. म्हणूनच या बदलत्या हवामानाचा जनावरांवर होणारा परिणाम अभ्यासने सुरू आहे. जेणे करून शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पशुधनाचे संरक्षण करता येईल, असे पाठक म्हणाले.
कृषीविषयक माहिती घेण्यासाठी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना हेल्पलाईन उपलब्ध आहे. त्याप्रमाणे पशूंच्या खाद्याची, त्यांच्या आजारपणाचे, त्यांच्यावर हवामानाचे होणारे परिणाम याची माहिती एसएमएसद्वारे मोबाईलवरून दिली जाईल. कोणत्या महिन्यात जनावरांना कोणता आजार होऊ शकतो, हे भ्रमणध्वनीवरून प्राधान्याने सांगितले जाईल. त्यासाठी आयसीएआर एक टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनावरांपासून माणसांना होणारे आजार किंवा माणसांपासून जनावरांना होणारे आजार नवीन नसून त्यावर अभ्यास, संशोधन करण्यासाठी ‘झोनेटिक सेंटर’ उभारण्याचा निर्णय आयसीआरने घेतल्याचे पाठक म्हणाले.