भारतीय विद्वान व विद्यापीठांनी सर्वदूर आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीचा ठसा उमटवला असून, नवे संशोधन प्रस्थापित केले आहे. विद्वान व विद्यापीठांनी संशोधनाच्या या कार्याला अधिक चालना द्यावी, असे आवाहन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ राज्यपाल पाटील व मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले हे होते. तर, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. जे. एच. जाधव, कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, आरोग्य विज्ञान संचालक डॉ. आर. के. आयाचित, डॉ. वेदप्रसाद मिश्रा, डॉ. प्रवीण शिणगारे, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, आर. के. गावकर यांच्यासह व्यवस्थापकीय मंडळ तसेच, अभ्यासक मंडळाच्या सदस्यांची उपस्थिती होती.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, सध्या सर्वच विद्यापीठ प्रगत होत असून, कमीत कमी मूल्यांमध्ये उच्च शिक्षणाची गंगा सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आव्हान या विद्यापीठांसमोर आहे. यासह अन्य आव्हानांना तोंड देत ही विद्यापीठं रोजगाराभिमुख व समाजाभिमुख शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. या पार्श्र्वभूमीवर कृष्णा वैद्यकीय विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करेल यात शंका नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज येथून पदवी घेऊन समाजात आरोग्य सेवेसाठी कार्यरत राहणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णसेवेत आपल्याला अखंड वाहून घ्यावे. माफक मूल्यांमध्ये रुग्णसेवा देणे हे त्यांचे कर्तव्य असल्याची खूणगाठ कायम अंगी बाळगावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले की, कृष्णा विद्यापीठ व कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या संशोधन कार्याला सातत्याने चालना दिली जात असून, या संशोधन कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता प्राप्त होत आहे. शिक्षण हा प्रगतीचा मार्ग असून, दिवंगत जयवंतराव भोसले यांनी शिक्षणातून प्रगती करण्याचे कार्य अवघे आयुष्यभर पार पाडले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच हे विद्यापीठ नावारूपास आले आहे. कृष्णा हॉस्पिटल हे ग्रामीण महाराष्ट्रातील महत्त्वाचे रुग्णालय असून, सर्वसामान्य रुग्णांना प्रगत आरोग्यसेवा अतिशय माफक दरात देण्याचा प्रयत्न आम्ही सतत करीत आलो आहोत. शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत कृष्णा हॉस्पिटलचे या विभागात मोठे योगदान राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
 दीक्षांत समारंभात ४७५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. संतोष पाटील व डॉ. स्मिता मंगलगी यांना कुलपती डॉ. जे. एच. जाधव यांच्या हस्ते विद्यावाचस्पती अर्थात पीएच. डी. पदवीने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ठ कामगिरी बजावणा-या विद्यार्थ्यांना राज्यपाल पाटील यांच्या हस्ते विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
तेह शूनसिंग ठरली पदकांची मानकरी
कृष्णा विद्यापीठातील सर्वाेत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणा-या स्वर्गीय जयवंतराव भोसले सुवर्णपदकाचा मान कुमारी तेह शूनसिंग हिला प्राप्त झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा विशेष सन्मान तिला प्रदान करण्यात आला. तसेच स्वर्गीय गोविंद विनायक अयाचित सुवर्णपदक, डॉ. एम. एस. कंटक पुरस्कार आणि डॉ. आर. एस. कोप स्मृतिपुरस्कारासह एकूण सात पुरस्कार कुमारी तेह शूनसिंग हिला प्राप्त झाल्याने आजच्या दीक्षांत समारंभात तिच्या गुणवत्तेची प्रशंसा केली गेली.