17 December 2017

News Flash

रात्रीच्या मुंबईची तलाश

दिवसा सारीच शहरे समान भासतात. तीच गर्दी, तीच कामाची धावपळ, तीच गाडय़ांची लागलेली रांग

प्रतिनिधी | Updated: November 20, 2012 11:28 AM

दिवसा सारीच शहरे समान भासतात. तीच गर्दी, तीच कामाची धावपळ, तीच गाडय़ांची लागलेली रांग आणि इकडून-तिकडे घाईघाईत जाणारे लोक. रात्री मात्र प्रत्येक शहराचे रंग वेगळे भासतात. खासकरून मुंबईचे.. खरी मुंबई रात्रीच कळते, असे म्हणतात. मुंबईसारख्या शहरात रात्री घडलेल्या एखाद्या घटनेचे कसे आणि किती पडसाद उमटू शकतात, याचा प्रत्यय चित्रपट दिग्दर्शिका-लेखिका झोया अख्तरने घेतला. तिने नंतर रिमा कागतीच्या मदतीने ही कथा लिहून काढली आणि ‘तलाश’ हा चित्रपट आकाराला आला. ‘तलाश’चा कथाविषय लक्षात घेऊन त्याच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक शहरातली रात्र अनुभवण्याचा चंगच आमीर खान आणि टीमने बांधला आहे.
एका रात्रीत रस्त्यावर घडलेला अपघात, हा अपघात होता की आत्महत्या, रात्री गस्तीवर असलेल्या इन्स्पेक्टर सृजनसिंह शेखावत अर्थात आमीर खानच्या मनात अनेक प्रश्न त्या क्षणी घोंघावत असतात. त्याच वेळी एक कॉन्स्टेबल त्याच्या कानाला लागतो आणि शहरात अशा आणखी दोन घटना घडल्या होत्या, अशी माहिती देतो. हे ऐकल्याबरोबर सृजनसिंहचा शोध सुरू होतो, ही रिमा कागती दिग्दर्शित ‘तलाश’ या चित्रपटाची थोडक्यात रूपरेखा आहे. हा चित्रपट एका सत्य अनुभवावर आधारित असल्याने त्याचे बरेचसे चित्रीकरण मुंबईतल्या वास्तव लोकेशन्सवर आणि तेही रात्रीच्या वेळी झालेले आहे. सूर्य मावळतीला गेला की तलाशचे चित्रीकरण सुरू व्हायचे. त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवर कायम रात्री गस्तीवर असणारे दोन पोलीस तैनात असायचे. आमीरने तलाशमधला सृजनसिंह रंगवताना या दोन पोलिसांकडून रात्री घडणाऱ्या घटनांचे स्वरूप, पोलिसांची कार्यपद्धती अशा अनेक गोष्टींची माहिती घेतली.
आता ‘तलाश’ प्रदर्शनासाठी तयार असताना त्याची प्रसिद्धीही तितक्याच वास्तव आणि वेगळ्या पद्धतीने व्हायला हवी, असा आमीर खानचा आग्रह होता. त्यासाठी चित्रपटाची कथा मुंबईत घडते, त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसिद्धीची सुरुवातही याच शहरापासून करायची आणि तीही रात्रीच्या वेळी असे आमीर खान आणि टीमने ठरवले आहे. रात्रीची मुंबई पिंजून झाल्यानंतर ‘तलाश’ची टीम नागपूर, इंदूर, बंगळुरू, कोलकाता, जालंधर, लखनौ, मेरठ अशा मुख्य शहरांमधून रात्री पत्रकार परिषद घेणार आहे. एवढेच नाही तर त्या त्या शहरातील प्रमुख ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना भेटणार आहे. ‘तलाश’ चित्रपटात जे वातावरण आहे त्याची जाणीव किंवा त्याच्याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण व्हावी, जेणेकरून लोकांना चित्रपट पाहावासा वाटेल, असे आमीरला वाटते आहे. त्यानुसारच या चित्रपटाच्या संपूर्ण प्रसिद्धीचे नियोजनही करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर सोनीच्या गाजलेल्या ‘सीआयडी’ या सीरियलशीही आमीरने हातमिळवणी केली असून एसीपी प्रद्युम्नच्या ‘सीआयडी’ टीमबरोबर दोन भाग आमीरने चित्रित केले आहेत. या आठवडय़ाच्या अखेरीस हे दोन भाग दाखवण्यात येणार आहेत. आमीर खान, राणी मुखर्जी आणि करिना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ३० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.   

First Published on November 20, 2012 11:28 am

Web Title: reserch of night life mumbai
टॅग Mumbai 2,Night,Talash