24 November 2017

News Flash

यंत्रमानवाला ‘स्मार्ट’ करण्यासाठी मधमाशीच्या मेंदूवर संशोधन

मधमाशीचा मेंदू तिळाएवढय़ा आकाराचा असतो पण त्याची क्षमता अफाट असते, त्या प्रवासाचा मार्ग लक्षात

Updated: January 8, 2013 12:58 PM

मधमाशीचा मेंदू तिळाएवढय़ा आकाराचा असतो पण त्याची क्षमता अफाट असते, त्या प्रवासाचा मार्ग लक्षात ठेवतात, हव्या त्या फुलांकडे जातात अशी अनेक कामे त्यांचा मेंदू करीत असतो. मधमाश्यांच्या मेंदूच्या ज्या क्षमता आहेत त्यांचा वापर करून यंत्रमानवाला अधिक स्मार्ट करण्याचा वैज्ञानिकांचा विचार आहे. त्यासाठी ते मधमाश्यांच्या मेंदूतील चेतासंस्थेचे प्रारूप तयार करीत आहेत.
शेफिल्ड व ससेक्स या विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मधमाशीच्या मेंदूचा खास अभ्यास केला असून मधमाश्या वास कसा घेतात, त्यांच्या संवेदना नेमक्या कशा असतात. त्यांची संवेदनाप्रणाली नेमकी कशी असते यावर त्यांनी अधिक भर दिला आहे. मधमाशीच्या मेंदूचे प्रारूप त्यांनी तयार केले असून त्याच्या मदतीने यंत्रमानवाला उडताना दिशा ओळखण्यास मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे संशोधन सुरू आहे. मधमाशीच्या मेंदूतील विविध प्रणालींची प्रारूपे तयार करून मधमाश्यांना दिसते कसे त्यांना वास कसा येतो, याचा उलगडा केला जात आहे असे बीबीसी न्यूजने म्हटले आहे. मधमाशीच्या संवेदनाप्रणालीचे प्रारूप नंतर यंत्रमानवाला मधमाशीच्या सहजतेने आजूबाजूचा परिसर दिसेल, दिशा समजतील अशा पद्धतीने वापरता येईल. मधमाश्या परागीभवन करून पिकांचे उत्पादन वाढवित असतात. आता कृत्रिम पद्धतीने यंत्रमानव परागीभवन करू शकतील अशी व्यवस्था करण्याचा विचार वैज्ञानिक करीत आहेत. शेफिल्ड विद्यापीठातील संगणक वैज्ञानिक डॉ. जेम्स मार्शल यांनी सांगितले की, मधमाशीच्या मेंदूचे प्रारूप तयार करणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील मोठे आव्हान आहे.  मानव, माकडे, उंदीर यांचे जैविक मेंदू सिलिकॉनमध्ये तयार करण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी झाले आहेत पण समूहाने राहणाऱ्या कीटकांची अनेक कौशल्ये आश्चर्यकारक आहेत. त्यामुळे त्यांच्या मेंदूचे प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

First Published on January 8, 2013 12:58 pm

Web Title: reserch on bee brain for makeing robert smart