ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी गटातील सदस्यांनी शुक्रवारी स्थायी समितीची सभा शिवसेना सदस्य तसेच सचिवांच्या अनुपस्थितीत घाईघाईने घेऊन विषय पत्रिकेवरील प्रस्ताव मंजूर केले. या प्रकारामुळे शिवसेना सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण होते. तसेच ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत या सभेचा इतिवृत्तांत देण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली. मात्र, ही सभा कायदेशीर असल्याचा दावा राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी गटाने केला आहे. त्यामुळे स्थायी समिती आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
शुक्रवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या स्थायी समिती सभेच्या पटलावर ११५ प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी आणले होते. त्यामध्ये बहुतेक विषय अवलोकनार्थ होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक आणि लोकशाही आघाडी गटाचे सर्व सदस्य सभेसाठी आले. त्यावेळी सभागृहात शिवसेनेचे सदस्य आणि महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित नव्हते. हे सर्वजण महापौर कार्यालयात एका बैठकीमध्ये होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त शामसुंदर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सचिव पदाचा तात्पुरता कार्यभार मुख्यालय उपायुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवून सभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन लोकशाही आघाडी गटाच्या सदस्यांनी सभा गुंडाळली आणि ते सभागृहाबाहेर पडले. त्याच वेळी शिवसेनेचे सदस्य सभागृहात दाखल झाले आणि सभा संपल्याचे पाहून अधिकच आक्रमक झाले. तसेच महापालिका सचिव जोशी हे रजेवर नसतानाही त्यांच्या जागी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यास बसवून सभा घेतल्याप्रकरणी शिवसेनेच्या सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त पाटील यांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी गटाने घेतलेली सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभा पुन्हा सुरू करण्याची मागणी शिवसेना सदस्यांनी केली. त्यासाठी शिवसेनेच्या सदस्यांनी ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांना सभापतीच्या खुर्चीवर बसवून सभा घेतली. त्यामध्ये ही सभा बेकायदेशीर असल्याचे जाहीर करून स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यासंबंधीचे आदेश वैती यांनी सचिवांना दिले. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण होते.