तालुक्यातील नागांव येथे ओएनजीसीचा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असून या प्रकल्पासाठी १९७८ साली ओएनजीसी प्रकल्पाकरिता नागांव, चाणजे व म्हातवली या गावांतील महसूल हद्दीतील पंधराशे एकरपेक्षा अधिक जमीन संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी देशाचा विकास डोळ्यासमोर ठेवून कवडीमोलाने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांना रोजगार, नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही प्रकल्पाची असताना प्रकल्पातील परप्रांतीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना नेहमीच सापत्न भावाची वागणूक दिली असल्याचा आक्षेप घेत ओएनजीसीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सध्या उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या पुनर्बाधणीचे काम सुरू असून या प्रकल्पातील नोकरभरतीत स्थानिकांना डावलून परप्रांतीयांची नोकरभरती केली जात असल्याचा आक्षेप ग्रामपंचायतींनी घेतला असून या परप्रांतीय नोकरभरतीविरोध तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा ग्रामपंचायतींनी ओ.एन.जी.सी. व्यवस्थापनाला दिला आहे. या प्रकल्पात येथील स्थानिक भूमिपुत्रांना पुनर्वसन म्हणून रोजगार मिळावा यासाठी लढा करावा लागला. या लढय़ातून तीस वर्षांपूर्वी दीडशेपर्यंत काही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला, मात्र शिक्षण नसल्याने तसेच वय अधिक असल्याने काही वर्षांतच अनेक जण निवृत्त झाले आहेत.
गेली तीस वष्रे जमिनी संपादित होऊनही अनेक जण पुनर्वसनाच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाच प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच प्रमाणे २०१५ पर्यंत उर्वरित प्रकल्पग्रस्त कामगारही निवृत्त होणार असल्याने ओएनजीसी प्रकल्पात एकही स्थानिक भूमिपुत्र नोकरीत राहणार नसल्याचेही ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. असे असताना डिसेंबर महिन्यात प्रकल्पात एकूण ४५ कामगारांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यातील बहुतांशी नियुक्त्या या परप्रांतीयांच्या झालेल्या असून ओ.एन.जी.सी. उरणमधील प्रकल्पातील नोकरभरती ही डेहराडून येथून होत आहे. या नोकरभरतीत स्थानिकांना डावलण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.