निवासी डॉक्टराला मारहाण करणाऱ्यांना अटक करा, डॉक्टरांना सुरक्षा द्या, या व इतर काही मागण्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी मंगळवारी सकाळपासून संप पुकारल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे अनेक रुग्णांवर उपचार होऊ न शकल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २७मध्ये जायदादी नावाची महिला रुग्ण दाखल झाल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. निवासी डॉक्टर डॉ. अमित बाहेती त्या महिलेवर उपचार करीत होते. त्या महिलेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना काही तपासणी करण्यास सांगितले. रुग्णांवर उपचार केले जात नसल्यामुळे जायदादी या महिलेच्या नातेवाईकांनी वार्डामध्ये डॉक्टर आणि परिचारिकेशी वाद घातला. रुग्णाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी करून डॉ. बाहेती यांना शिवीगाळ केली. त्यामुळे बाहेतीच्या सहकाऱ्यांनी त्यांना समजाविले मात्र ते समजण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी बाहेती यांना मारहाण केली. त्यांची कॉलर पकडमून त्यांना वॉर्डाच्या बाहेर आणले आणि मारहाण केली.
हा सर्व प्रकार सुरू असताना सुरक्षा रक्षक जागेवर नव्हता. बाहेती यांना मारहाण केल्यावर काही लोक तेथून पळून गेले. डॉ. बाहेती यांना मारहाण केल्याची बातमी मेडिकल रुग्णालयात कळताच सर्व निवासी डॉक्टर घटनास्थळी आले. अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे, डॉ. मुरारी सिंग आदी डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांची समजूत काढली.
दरम्यान, डॉ. बाहेती यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ मार्डने आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मारहाण करणाऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत कामावर जायचे नाही, असा निर्णय घेत रुग्णालयातील ३०० निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. मेडिकलमध्ये डॉक्टरांना सुरक्षा नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहे.
यापूर्वी निवासी डॉक्टरांना अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण केली जाते. मात्र, मेडिकल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप मॉर्ड संघटनेच्या अध्यक्षांनी केला. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णालयातील सेवा विस्कळीत झाली. अनेक रुग्णांकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टर नव्हते. विशेषत: बाह्य़ रुग्ण विभाग आणि अतिविशेषोपचार विभागात आलेल्या रुग्णांना संपाचा चांगलाच फटका बसला.
या संदर्भात मार्डचे अध्यक्ष डॉ. मोकद्दम म्हणाले, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे.
केंद्रीय संघटनेशी या संदर्भात बोलणे सुरू आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक केली नाही तर राज्यातील सर्व निवासी डॉक्टर संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार आणि मेडिकल प्रशासनाला निवेदन दिले असताना त्यावर कुठलाच तोडगा निघत नसल्याने संपाशिवाय पर्याय नाही, असेही मोकद्दम म्हणाले.