ए वॉर्डमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पे अ‍ॅण्ड पार्क अंतर्गत सुधारित वाहन शुल्क धोरणाची अंमलबजावणी करण्यास सरसावलेल्या पालिकेला स्थानिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही प्रकारे चर्चा न करता तसेच अंमलबजावणीचा आराखडा तयार नसताना १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत असलेले शुल्क देण्यास नागरिकांचा विरोध आहे. या संदर्भात पालिकेने तीन दिवसांत चर्चा केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मंगळवारी देण्यात आला.
स्थानिक नगरसेवक विनोद शेखर व सुषमा साळुंखे यांनी मुख्यमंत्री, आयुक्त व महापौर यांना पत्र लिहून स्थानिकांचा  विरोध कळवला आहे. संपूर्ण शहरात सुधारित धोरण राबवण्याआधी प्रायोगिक तत्त्वावर ते १ फेब्रुवारीपासून चर्चगेट, फोर्ट व कुलाबा या परिसरात राबवण्यात येणार आहे. मात्र या विभागातील रहिवाशांच्या गाडय़ांची संख्या, त्यांचे मालक व या गाडय़ा उभ्या असलेली जागा याबाबत पालिकेकडे कोणतीही नोंद नाही. मग रात्रीचे शुल्क पालिका कसे घेणार आहे, सकाळी आठनंतर गाडी उभी राहिल्यास त्याबाबत कोणते नियम लावणार आहे, या परिसरातील जुन्या इमारतींमध्ये पार्किंगला जागा नाही, मग पालिकेकडून वाहनतळ बांधण्यात आलेले नसताना रहिवाशांना सक्तीचा भरुदड कशासाठी, असे विचारत रहिवाशांनी त्रागा व्यक्त केला.