सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना राष्ट्रवादीने राजीनामा देण्याचा आदेश देताच आटपाडी पंचायत समितीच्या सभापतींसह सात सदस्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. उपसभापतींसह बळवंतराव मोरे यांच्यासह तालुक्यातील पाचशे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना भेटून देशमुख यांना मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी केली.
अध्यक्ष देशमुख यांना मुदतवाढ मिळावी, अशी भूमिका तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. मात्र नवीन लोकांना संधी देण्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांनी जि. प. अध्यक्ष देशमुख यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. पक्षाच्या निर्णयाविरुद्ध आटपाडी तालुक्यात असंतोष पसरला आहे.
आटपाडी पंचायत समितीच्या सभापती अलका भोसले, उपसभापती बळवंत मोरे, सदस्य भगवान माळी, भीमराव वाघमारे, वैजयंता कदम, सुनीता गायकवाड आणि सुमन देशमुख या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविले असून त्याच्या प्रती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविल्या आहेत. आटपाडी पंचायत समितीचे आठ सदस्य असून एक सदस्य राष्ट्रीय समाज पार्टीचा आहे. उर्वरित राष्ट्रवादीच्या सात सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.
शुक्रवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन देशमुख यांना आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली. तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती असताना नेतृत्वबदल टाळावा. जिल्हा परिषद अध्यक्षच्या रुपाने तालुक्याला पहिल्यांदा संधी मिळाली आहे. त्यामुळे दुष्काळ सुसह्य होण्यास मदत झाली आहे. दुष्काळी भागाला संधी  केवळ १७ महिन्यांची दिली जाते हे अन्यायकारक आहे. सधन भागाला संधी दिली तर त्याचा दुष्काळी भागामध्ये वेगळा संदेश पक्षाच्या बाबतीत जाईल, असे सांगत जिल्हा परिषदच्या चार सदस्यांसह विविध ग्रामपंचायतींचे व विकास सोसायटीचे पदाधिकारी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.
गृहमंत्री पाटील यांची भेट घेणाऱ्यांमध्ये उपसभापती मोरे यांच्यासह हरिभाऊ माने, विजय पाटील, महिपतराव पवार, विष्णुपंत चव्हाण, राष्ट्रवादीचे विविध गावचे सरपंच, विकास सोसायटय़ाचे चेअरमन अशा ५०० हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.