जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या चर्चेवेळी टोलविरोधी कृती समितीने आर्यन हॉस्पिटॅलिटीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे कागदपत्रांच्या आधारे ठामपणे सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी आयआरबी कंपनी आर्यन हॉस्पिटॅलिटीला नोटीस बजाविण्याचे जाहीर केले. दरम्यान, आयआरबी कंपनीची टोलवसुली करणाऱ्या स्थानिक कर्मचा-यांनी नोकरी सोडण्याचे आवाहन कृती समितीने केल्यानंतर आज सुमारे २० तरूणांनी या कामावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.    
टोल विरोधी कृती समितीने आयआरबी कंपनीच्या दोषांकडे लक्ष पुरविण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेने आयआरबी कंपनीला टेंबलाईवाडी येथे ३ लाख चौरस फुटाचा भूखंड प्रदीर्घ कालावधीसाठी दिला आहे. या जागी आर्यन हॉस्पिटॅलिटीचे बांधकाम सुरू झाले आहे. या जागेचा एनए परवाना नसतांनाआणि बांधकाम परवान्याच्या अनेक नियमांचे उल्लंघन केल्याच्या मुद्यावरून टोलविरोधी कृती समितीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी माने यांनी आज दुपारी टोलविरोधी कृती समितीला चर्चेसाठी पाचारण केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे चार तास चाललेल्या चर्चेत कृती समितीने आर्यन हॉस्पिटॅलिटीच्या बांधकाम परवान्याबाबत कायद्याचा कीस पाडला.  
ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी, महापालिकेच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेली कागदपत्रे बनावट व चुकीची असल्याने जागेचा एनए परवाना सत्वर रद्द करावा, अशी मागणी केली. अ‍ॅड.गोविंद पानसरे यांनी, तोडगा काढण्यापूर्वी प्रथम बांधकामास स्थगिती द्यावी आणि नंतरच चौकशीला सुरूवात करावी, अशी मागणी केली. प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी महापालिकेच्या अधिका-यांनी आर्यन हॉस्पिटॅलीटीसाठी कोणती बोगस कागदपत्रे दिली आहेत, याचा पंचनामा केला. टीडीआर प्रश्नासाठी लढणारे नगरसेवक भूपाल शेटे यांनी बांधकामाच्या जागेतून वाहता नाला गायब झाला असल्याचे निदर्शनाला आणून दिले. कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी जागेचा कब्जा असलेल्या आयआरबी कंपनी आणि सध्या ती हस्तांतर करण्यात आलेली आर्यन हॉस्पिटॅलिटी या दोघांनीही उघडपणे कशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केले आहे, याचे विवेचन केले. कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचे अवलोकन करून जिल्हाधिकारी माने यांनी एनएचा परवाना लगेच रद्द करण्यात येत नसल्याने प्रथम आयआरबी व आर्यन हॉस्पिटॅलीटीला नोटीस बजाविण्याचे जाहीर केले.    
बैठकीवेळी आपली भूमिका मांडण्यासाठी एकाच वेळी कृती समितीचे अनेक कार्यकर्ते उभे राहत होते. त्यावरून परस्परात वाद झडत होता. स्थायी माजी सभापती राजू लाटकर व नगरसेवक शेटे यांच्यातील वादानंतर चांगलाच गोंधळ उडाला. अ‍ॅड.पानसरे यांनी सर्वाची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला. बैठकीस महापौर सुनीता राऊत, आमदार चंद्रदीप नरके, महापालिका उपायुक्त संजय हेरवाडे आदी उपस्थित होते.