औषध मागण्याच्या बहाण्याने दरवाजा वाजवून चोरी करणाऱ्या चोरटय़ांना प्रतिकार करणाऱ्या तरूणीवर चाकूने वार केल्याची घटना रावेत येथे मंगळवारी पहाटे घडली. या घटनेत तरूणीसह तिचा भाऊ जखमी झाला आहे.
उंबरादेवी जगदीशकुमार वोरा (वय २४, रा. समीर लॉन समोर, रावेत; मूळगाव- राजस्थान) व तिचा भाऊ जगदीशकुमार खोरवाल (वय २२) हे दोघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे जगदीश व त्याच्या भावाचे ‘जगदीश ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान आहे. जगदीशचे वडील आजारी असल्यामुळे त्याचा मोठा भाऊ राजस्थानला गेला आहे. तर त्याची बहीण वोरा या दोघा भावांसोबत राहत आहे. नेहमीप्रमाणे वोरा व तिचा भाऊ दुकान बंद करून पाठीमागील घरात झोपलेले होते. पहाटे दोनच्या सुमारास दुचाकीवरून दोन तरूण आले. त्यांनी आजारी असल्याने औषध हवे आहे, म्हणून दरवाजा ठोठावण्यास सुरूवात केली. त्या आवाजामुळे वोरा या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी कोण आहे, असे विचारले. पण नाव सांगत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे चोरटय़ांनी दरवाजावर दगड घालून  दरवाजा तोडला. त्या आवाजाने जगदीशही जागा झाला. त्याने आरडा-ओरडा करुन मदतीसाठी घराबाहेर धावत आला. चोरटे घरात शिरून चोरी करत असताना वोरा यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरटय़ांनी त्यांच्या पोटावर चाकूने वार केले. भाऊ मध्ये आला असता त्याला मारहाण केली. जगदीशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारचे नागरिक धावत आले. त्यामुळे चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांनी आपल्या चेहऱ्याला रूमाल बांधलेला होता. या घटनेत वोरा व जगदीश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वोराची प्रकृती स्थिर आहे, तर जगदीशला घरी सोडण्यात आले आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.