क्लेरा ब्रुस शाळेचे मैदान व या परिसराची मालमत्ता बांधकाम व्यावसायिक शरदमुथा व धारीवाल यांना ताब्यात घेऊन देऊ नये, त्यांना मज्जाव करावा या मागणीसाठी जिल्हा प्रेईस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली ख्रिश्चन समाजाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन जोरदार निदर्शने केली.
अब्जावधी रुपये किंमत असलेली शहरातील मोक्याच्या ठिकाणची ही विस्तीर्ण जागा संस्थेच्या विश्वस्तांकडून आपण विकत घेतल्याचा दावा मुथा व कंपनीने केला असून, त्यानुसार या जागेचा ताबा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याला ख्रिश्चन समाजाचा विरोध असून, हा सर्व व्यवहारच बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परस्परविरोधी कृतीमुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. या व्यवहाराच्या विरोधात गुरुवारी कोठीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मोर्चात मोठय़ा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. त्यात महिलांचाही मोठा समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष ताराचंद चक्रनारायण, उपाध्यक्ष रेव्हरंड एस. डी. नाईक, सचिव रेव्हरंड एम. एस. पडागळे, रेव्हरंड सी. बी. उजागरे, रेव्हरंड तेजपाल उजागरे आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा प्रेईस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वायडर चर्च मिनिस्ट्रीज व मराठी मिशन या संस्थांची ही जागा आहे. गेल्या दोनशे वर्षांपासून ही जागा ख्रिश्चन समाजाच्या ताब्यात आहे. ही जागा कायमस्वरूपी विश्वस्तांच्याच ताब्यात असल्याचा करारही झाला आहे. या जागेचे हस्तांतर करू नये असा आदेश पूर्वीच मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. मात्र काही तथाकथित विश्वस्तांनी बेकायदेशीररीत्या या जागेचे हस्तांतरण केले आहे. या बेकादेशीर हस्तांतरणाचा गैरफायदा घेऊनच शरद मुथा व धारीवाल हे बांधकाम व्यावसायिक राज्य सरकार व न्यायालयाच्याही आदेशाचे उल्लंघन करून गुंडगिरीद्वारे या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या जागेवर सध्या मुला-मुलींची शाळा, वसतिगृह, प्रार्थना मंदिर व प्रार्थना घेण्यासाठी मोकळी जागा आहे. येथील मुलांची शाळा ही राज्यातील पहिली शाळा असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. सन २००३ नंतर मराठी मिशनवर कोणीही विश्वस्त अधिकृत नाही. वायडर चर्च मिनिस्ट्रीचेही विश्वस्त कायदेशीर नाहीत. याबाबतचे अनेक दावे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू आहेत. बेकायदेशीर हस्तांतरणाची अंमलबजावणी झाल्यास ख्रिश्चन समाजाचे मोठे नुकसान होणार असून भावनांवरही हा आघात आहे. त्याची दखल घेऊन या जागेच्या हस्तांतरणास मनाई करावी, मुथा व धारीवाल कंपनीचे लोक व त्यांच्या हस्तकांना या जागेत येण्यास मज्जाव करावा, हे बेकायदेशीर खरेदीखत व रॉबर्ट मोजेस, डी. जी. भांबळ यांच्यासह अन्य तथाकथित विश्वस्तांची सीबीआय चौकशी करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.